Girish Mahajan : “आमच्या वयाचा विचार करता…”; गिरीश महाजन राजकारणातून निवृत्ती घेणार? भरकार्यक्रमात थेटचं बोलले
Girish Mahajan : या कार्यक्रमात बोलताना गिरीश महाजन यांनी निवृत्ती घेणार असल्याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

Girish Mahajan : भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी चाळीसगाव शहरातील विकास कामांच्या कार्यक्रमात बोलताना एक मोठं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळे ते सक्रिय राजकारणात निवृत्ती घेणार असल्याचे संकेत मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
चाळीसगाव शहरात विविध शासकीय कार्यालयांचे उद्घाटन तसेच विकासकामांचा शुभारंभ मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात बोलताना गिरीश महाजन यांनी निवृत्ती घेणार असल्याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. तसेच यावेळी बोलताना दोन्ही मंत्र्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले.
गिरीश महाजन काय म्हणाले?
“आमच्या वयाचा विचार करता आम्ही किती दिवस काम करणार आहोत, कोणाच्या तरी चांगल्या हातात पक्षाची धुरा द्यावी लागणार आहे. त्यावेळी मंगेश चव्हाण हे नाव भावी नेता म्हणून सांगावं वाटतं.” असं वक्तव्य करत गिरीश महाजन त्यांनी एक प्रकारे निवृत्तीचे संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सुरुवातीला भारतीय जनता पक्षाने मंगेश चव्हाण यांना उमेदवारी दिली, तेव्हा त्यांची फारशी ओळख नव्हती. अत्यंत कमी मताधिक्याने ते निवडून आले होते. मात्र, निवडून आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने विकासकामांचा धडाका लावला, ते पाहून आम्हालाही त्यांचा हेवा वाटतो, अशा शब्दांत महाजन यांनी आमदार मंगशे चव्हाण यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले.
गुलाबराव पाटील म्हणाले?
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “कामाची भूक असलेला नेता म्हणजे आमदार मंगेश चव्हाण आहे. मंगेश चव्हाण यांनी चाळीसगावचा विकास करताना गिरीश महाजन यांच्या मार्गाने विकास केला आहे, हे इतर आमदारांनाही सांगावे लागेल. चाळीसगाव हे महत्त्वाचे शहर आहे. जिल्ह्यापासून दूर असल्याने या ठिकाणी विकासकामे होणे महत्त्वाचे आहे आणि इथे मात्र त्यांनी मोठे काम करून दाखवले आहे.” असे म्हणत आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर कौतुकाची थाप दिली.





