Pimpri : तळेगावमधील बामणडोह विहिरीच्या संवर्धनाला सुरुवात

तळेगाव दाभाडे : शहरातील पुरातन बामणडोह या विहिरीचे संवर्धन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रविवारी (दि.२९) तळेगाव दाभाडे नगर परिषद, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि भटकंती ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम सुरु करण्यात आली.
या कामांतर्गत विहिरीच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच विहिरीच्या परिसरात वाढलेले गवत काढण्यात आले. विहिरीची आंतरिक सफाई करताना पाण्यावर तरंगणारा कचरा काढून घेण्यात आला. सोबतच विहिरीच्या पाण्यातील गाळाचा विद्युत यंत्राच्या साहाय्याने उपसा करण्यात आला. याप्रसंगी भटकंती ग्रुप, शिव प्रतिष्ठान ग्रुप, वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियानाची प्रभावी अंमबजावणी करण्याच्या हेतूने ‘जल’ या पंचतत्वाअंतर्गत बामणडोह या ऐतिहासिक विहिरीचे जतन व संवर्धन करण्याचे नियोजित करण्यात आले. सोबतच मुख्याधिकारी यांनी शहरातील अन्य ऐतिहासिक विहिरीचे पुनर्जीवन करण्याबाबतचा कृती आराखडा तयार केला आहे
पुरातन बामणडोह विहिर…
तळेगाव शहरातील बामण डोह ही विहीर सुमारे ३०० ते ३५० वर्ष इतकी पुरातन आहे. विहिरीचा आकार बऱ्याच अंशी महादेवाच्या पिंडी सारखा भासतो. या ठिकाणी अजूनही मोटावरची बैलांची धावपट्टी व दगडी पाण्याचा पाट असण्याची खूण मिळते. सदर विहिरीस राजवारसा असल्या कारणाने ऐतिहासिक वास्तू जपणे ही काळाची गरज आहे. त्याच अनुषंगाने तळेगाव दाभाडे शहरातील भटकंती ग्रुप, शिव प्रतिष्ठान ग्रुप, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि तळेगाव दाभाडे नगर परिषद यांच्या अथक प्रयत्नाने बामण डोह या विहिरीचे जतन व संवर्धन करण्यात आले.
याप्रसंगी उपमुख्याधिकारी ममता राठोड, आरोग्य निरीक्षक प्रमोद फुले, शहर समन्वयक गीतांजली होनमने, सचिन शेडगे, निलेश मंडेकर, सत्यशील राजे दाभाडे, निलेश गराडे, रणजीत सूर्यवंशी, देविदास पुंड उपस्थित होते.





