संग्राम थोपटेंनी साधली हॅट्ट्रिक

भोर तालुक्यातील विसगाव आणि हिर्डोशी खोऱ्याने तारले
भोर – भोर विधानसभा निवडणुकीत आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार कुलदीप कोंडे यांचा 9 हजार 206 मतांनी पराभव केला आहे. आमदार संग्राम थोपटे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली असली तरी त्यांना विजयासाठी झगडावे लागल्याचे निकालाच्या आकडेवारीवरुन दिसत आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत विजयाचा जल्लोष साजरा केला.
भोर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीत गुरुवारी (दि. 24) सकाळी आठ वाजता मत मोजणीस मुळशी तालुक्यापासून सुरुवात झाली. मतमोजणीच्या 16 फेऱ्यात कुलदिप कोंडे यांनी तर 10 फेऱ्यात आमदार संग्राम थोपटे यांनी नाममात्र मतांची आघाडी मिळवली होती. मुळशी तालुक्यातील मतदारांनी आमदार संग्राम थोपटे यांना चांगली साथ दिली. मात्र, 9व्या फेरीअखेर कोंडे यांनी 1 हजार 591 मतांची आघाडी घेतली होती. 10व्या फेरीत कोंडे यांनी 298 मतांची तर 11व्या फेरीत थोपटे यांना 727 मतांची आघाडी मिळाली. 13व्या फेरीत कोंडे यांनी पुन्हा 1 हजार 50 मतांची आघाडी घेतली. 14 ते 19व्या फेरीत कोंडे आघाडीवर होते.
मात्र, 20व्या फेरीत आमदार थोपटे यांनी 936 मतांची आघाडी घेतली. त्यानंतर आमदार थोपटे यांनी 21 ते 25व्या फेरीमध्ये आघाडी घेत अखेर 9 हजार 206 मतांनी विजयी झाले. आमदार थोपटे यांना 1 लाख 8 हजार 925 तर शिवसेनेचे उमेदवार कोंडे यांना 99 हजार 719 मते मिळाली.विजयाचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर आमदार थोपटे यांनी शेटेवाडी चौपाटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर आमदार संग्राम थोपटे यांची सजविलेल्या रथातून भोर शहरात मिरवणूक काढण्यात आली.
माझा विजय हा मी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हाच नक्की झाला होता. मात्र छत्रपतींचे नाव घेवून मतदारांची दिशाभूल विरोधकांनी केली. तरीही खऱ्या मावळ्यांनी नकली मावळ्यांना झटका दिला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि भोर, वेल्हा, मुळशीतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले – संग्राम थोपटे, आमदार





