कॉंग्रेसची पहिली गॅरंटी ! ‘शेतकऱ्यांना दिली एमएसपीची हमी…’; राहुल गांधी यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली – कॉंग्रेसने मंगळवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. तसेच, केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आल्यास विविध पिकांना किमान आधारभूत किंमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी उपलब्ध करण्याची ग्वाहीही दिली.
शेतकरी बंधूंनो, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. स्वामिनाथन आयोगाने केलेल्या शिफारसींनुसार एमसपीबाबत कायदेशीर हमी देण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला आहे. ते पाऊल १५ कोटी शेतकरी कुटूंबांची समृद्धी निश्चित करेल आणि त्यांचे जीवन बदलून टाकेल.
न्यायाच्या मार्गावरील ती कॉंग्रेसची पहिली गॅरंटी आहे. आमची कायदेशीर गॅरंटी शेतकऱ्यांच्या जीवनात ३ महत्वाचे बदल घडवेल. पिकाला योग्य भाव मिळाल्याने शेतकरी कर्जाच्या जाचातून मुक्त होईल. कुठलाच शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होणार नाही. शेती हा फायद्याचा व्यवसाय बनून शेतकरी समृद्ध होईल.
समृद्ध शेतकरी देशाचे भविष्य बदलवून टाकेल, असे भाष्य कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून केले. राहुल यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा सध्या छत्तिसगढमधून मार्गक्रमण करत आहे.
त्या यात्रेवेळी बोलताना कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही एमएसपीचा मुद्दा उचलून धरला. कॉंग्रेसला केंद्रात सत्ता मिळाल्यास शेतकरी न्याय गॅरंटीची अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी नमूद केले.





