Sanjay Raut : काँग्रेसचा पोटनिवडणूक लढण्याचा निर्धार! संजय राऊतांनी त्या गोष्टीची आठवण करुन दिली, म्हणाले “ज्या ठिकाणी..”
Sanjay Raut : बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवार दिला जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. अशातच खासदार संजय राऊत यांनी मोठी प्रतिक्रिया यावर दिली आहे.

Sanjay Raut : बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणूक 23 एप्रिलला होणार आहे. त्यामुळे हालचालींना वेग आला आहे. राहुरीमध्ये भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर बारामतीत सुनेत्रा पवार निवडणूक लढणार आहेत.
अशातच या निवडणुकीत दोन्ही ठिकाणी काँग्रेस उमेदवार देणार असल्याची मोठी बातमी समोर आली होती. यानंतर आता यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दोन्ही ठिकाणी काँग्रेस उमेदवार देणार असल्याचे बोलले जात आहे असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले, या दोन्ही ठिकाणचा निर्णय महाविकास आघाडी म्हणून एकत्रित बसून घेतला जाईल. दोन्ही ठिकाणी काँग्रेसकडून चाचपणी केली जात असून, मुलाखती देखील घेतल्या गेल्या आहेत, अशी माहिती समोर आली आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, शेवटी लोकशाही आहे. प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे.
राहुरीमध्ये शिवसेनेकडून अनेक इच्छूक कार्यकर्ते आहेत. पण त्या जागेवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकार आहे. भारतीय जनता पार्टीला फायदा होऊ नये अशीच आमची भूमिका असणार आहे. जिथे ज्याची जास्त ताकद तिथे त्याचा उमेदवार असा महाविकास आघाडीचा फॅार्म्युला ठरल्याची आठवण संजय राऊतांनी करुन दिली.
दोन्ही ठिकाणच्या जागेसंदर्भात तिन्ही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष, प्रमुख नेते एकत्रित बसून काय तो निर्णय घेतील. जी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे ते पाहता बारामतीत कदाचित शरद पवारांचा पक्ष निवडणूक लढणार नाही. जर कोणाला लढायचं असेल तर विरोध करु नये, असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव?
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तसेच त्याअगोदर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा होता आहे. पोटनिवडणुकीतही तसेच काहीसे चित्र असल्याचे बोलले जात आहे.





