Harshwardhan Sapkal : भाजपला निवडणूक जिंकायला काँग्रेसवालेच लागतात : हर्षवर्धन सपकाळ

Harshwardhan Sapkal On Chandrashekhar Bawankule | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने भाजपकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. विशेष करून पुणे जिल्ह्यात वेगाने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपात प्रवेश केला.
त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित केलं. “काँग्रेसला फोडा आणि रिकामी करा”, असे आदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
तर दुसरीकडे याच वक्तव्याचा काँग्रेसकडून जोरदार समाचार घेत प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजप ही काँग्रेसचे नेते खाणारी चेटकीण आहे. विरोधकांना फोडण्याचं जे भाजप प्रयत्न करतोय, त्याचा आम्ही निषेध करतो. असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
पुढे बोलताना म्हणाले, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे मोठे नेतृत्व सांगणारे नेते त्यांच्याकडे आहेत. परंतु ते काँग्रेसच्या भरवशावर निवडणुका जिंकतात हा विश्वास भाजपमध्ये आहे, असंही सपकाळ यावेळी म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस फोडण्याच्या केलेल्या वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ परभणीत बोलत होते. महत्त्वाचं म्हणजे शंकराचार्य यांनी राहुल गांधींना हिंदू धर्मातून बहिष्कृत केल्याच्या वक्तव्यावरही त्यांनी भाष्य केलं.
काय म्हणाले होते चंद्रशेखर बावनकुळे?
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काँग्रेसला लोकं सोडून चालली आहेत. संग्राम थोपटे यांनी सगळं काँग्रेसला दिले तरी सुद्धा त्यांना पक्ष सोडावा लागला. त्यांना त्यांच्या पक्षाकडून, राहुल गांधी यांच्याकडून अपेक्षा नाहीत. कुठलं ही धोरण काँग्रेसला नाही. जो जो काँग्रेस किंवा इतर पार्टी मधून आमच्याकडे येईल त्याचे स्वागत आहे. काँग्रेसला फोडा, काँग्रेसला रिकामी करा. काँग्रेसची लोकं आपल्याकडे आली तरी तुमचा आधी विचार करणार असं आश्वासन बावनकुळे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिलं. Chandrashekhar Bawankule |





