अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गृहराज्य असणाऱ्या गुजरातवर अधिकाधिक फोकस करण्याचे कॉंग्रेसने ठरवले आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी तर भाजपला मात देण्यासाठी प्रभावी प्लॅन बनवण्याची ग्वाही दिली आहे. गुजरातमध्ये भाजप १९९५ यावर्षापासून सत्तेवर आहे. त्या राज्यात पुढील विधानसभा निवडणूक २०२७ यावर्षी होईल. ती निवडणूक विचारात घेऊन कॉंग्रेसने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्या प्रयत्नांचा भाग म्हणून कॉंग्रेस गुजरातमध्ये विविध कार्यक्रम हाती घेणार आहे. पुढील महिन्यात पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन त्याच राज्यात होणार आहे. अशात राहुल शुक्रवारी दोन दिवसीय दौऱ्यासाठी गुजरातमध्ये दाखल झाले. त्यांनी अहमदाबादमध्ये ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काय पाऊले उचलता येऊ शकतील याविषयी त्यांनी नेते-कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली. संबंधित बैठकांमध्ये राहुल यांनी प्रदेश शाखेत व्यापक फेरबदल करण्याचे संकेत दिले. तसेच, महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या समस्या आदी मुद्द्यांवर आवाज उठवण्याची सूचना नेत्यांना, कार्यकर्त्यांना केली.