पुणे – भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदार संघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. हा मतदार संघ “आघाडी’ धर्मानुसार कॉंग्रेसकडे असला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इच्छुकही आपला हक्क सांगू लागले आहेत. “आघाडी’चा हा गोंधळ सुरू असतानाच या मतदार संघात युतीच्या निर्णयाचीही वाट न पाहताच शिवसेनेने कॉंग्रेसची मक्तेदारी मोडून काढण्याकरिता मोट बांधली आहे. सह्याद्री खोऱ्यात यावेळी कोणत्याही परिस्थितीत भगवा फडकवायचाच, असा चंग शिवसैनिकांनी बांधला आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ म्हणून भोर-वेल्हा-मुळशीचा उल्लेख केला जातो. या मतदारसंघावर 45 वर्षे कॉंग्रेसची पकड आहे.
भोरचे लोकनेते म्हणून ओळखले जाणारे अनंतराव थोपटे यांनी भोर आणि वेल्हेत कॉंग्रेस पक्ष खऱ्याअर्थी रूजवला आणि वाढविला. केंद्रात आणि राज्यात कॉंग्रेसची सत्ता होती त्यावेळी अनंतराव थोपटे यांनी मंत्रीपदाच्या आपल्या कारकिर्दीत भोर आणि वेल्हेतील महत्त्वाची कामे मार्गी लावली. त्यानंतर दोनवेळा आमदार झालेल्या संग्राम थोपटे यांच्या माध्यमातूनही तालुक्याच्या विकासाच्यादृष्टिने अनेक महत्त्वपूर्ण कामे झाली. आमदार थोपटे यांच्या कार्यकाळात विकासाचा आलेखही चढता राहिला आहे. परंतु, त्यांच्या विरोधातील काही मुद्दे घेऊन थोपटे यांची सत्ता पालटविण्यासाठी विरोधक प्रयत्नशील आहेत. केवळ भोर आणि वेल्हे तालुक्यापुरता मर्यादित या मतदारसंघाची 2009 च्या विधानसभा निवडणुकीवेळी फेररचना झाली आणि मुळशी तालुका मतदारसंघाला जोडला गेला, त्यातून अन्य पक्षांचेही वर्चस्व वाढत गेले. जनतेने कॉंग्रेसच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून थोपटे यांना निवडून दिले. याच काळात अन्य पक्षांनीही आपले बस्तान बसविले. पाच वर्षात कॉंग्रेस आणि शिवसेनेसह आता भाजपनेही आपले स्वतंत्र अस्तित्त्व भोर-वेल्हा-मुळशी मतदारसंघात निर्माण केले आहे.
आघाडीतील कॉंगेसचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने घरचा आहेर देत सध्याच्या लोकप्रतिनिधींविषयी नाराजी व्यक्त करीत या मतदारसंघावर हक्क सांगण्यास सुरवात केली आहे. यातून मतांची विभागणी होऊन भगवा फडकविण्याकरीता शिवसेना प्रयत्नशील आहे. यातून भोर मतदारसंघात वेगळे चित्र दिसू शकते. भोर मतदारसंघातील तालुके सह्याद्रीच्या डोंगररांगालगत वसले आहेत. त्यामुळे विकासकामांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे मतदार संघात अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजीचा सुरू आहे. आघाडीत बिघाडी झाली आणि युती फिस्कटली तर आमदार संग्राम थोपटे यांना सोप्या वाटणाऱ्या या मतदारात संघात चुरशीच्या लढतील होतील, असा अंदाज बांधला जात आहे.
आमदार थोपटे यांची सावध भूमिका…
भोर विधानसभा मतदार संघ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील आघाडीच्या नियमानुसार कॉंग्रेसकडेच राहणार असल्याचे सांगितले जात असल्याने यावेळी कॉंग्रेसकडून संग्राम थोपटे यांनाच उमेदवारी मिळेल, असे निश्चित मानले जात आहे. परंतु, राष्ट्रवादीमधील विरोधी गट थोपटेंविरोधात सक्रीय झाल्याने याचा फटका त्यांना बसू शकतो, आघाडीच्या मुद्यावर गाफील राहिल्यास थोपटे यांचे मताधिक्य कमी होऊ शकते, याच कारणातून थोपटे हे राष्ट्रवादीबाबत सावध भूमिका ठेवून आहेत.