“काँग्रेसने पाच राज्यांच्या निवडणुकीत जनतेचा पैसा वापरला”; माजी पंतप्रधानांचा आरोप

H. D. Deve Gowda : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (H. D. Deve Gowda) यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेचा पैसा वापरल्याचा आरोप एचडी देवेगौडा यांनी केला आहे.
जेडीएस प्रमुख एचडी देवेगौडा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आणि दावा केला की कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला मदत करण्यासाठी जनतेचा पैसा वापरला. ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पाच राज्यांतील निवडणुका लढवण्यासाठी काँग्रेस पक्षाला दिला. तो जनतेचा पैसा सिद्धरामय्या रोखू शकले नाहीत. सिद्धरामय्या आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी पैसे किती आणि कुठे नेले हे आता उघड झाले आहे.
पुढे ते म्हणाले, “पाच राज्यांच्या निवडणुकांदरम्यान बंगळरुरातून किती पैसे गेले? ही संपत्ती कोणाची आहे? हा कर्नाटकातील जनतेचा पैसा आहे. आमचे उपमुख्यमंत्री शिवकुमार आणि त्यांचा उद्धटपणा वाढत आहे. निवडणुकीदरम्यान ते कुठे आणि किती पैसे घेऊन गेले? केंद्रीय निवडणूक आयोगने किती पैसे जप्त केले, हे सर्व आता उघड झाले आहे.”
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावरही निशाणा साधला. सिद्धरामय्यामध्ये भ्रष्टाचार रोखण्याची ताकद आहे की नाही, हे मला माहित नाही. ते देशाला व्याख्यान देतात की, “कोणीही त्यांच्या प्रशासनाकडे बोट दाखवू शकत नाही. गरीब, अल्पसंख्याक, मागासवर्गीय, दलित खंबीरपणे यांच्या पाठीशी उभे आहेत. तरीही पैसा वाहत आहे.ते भ्रष्टाचार का थांबवू शकत नाहीत?’ असा सवालही देवेगौडा यांनी केला.
दरम्यान, नुकत्याच तेलंगणा, मिझोराम, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. तीनही राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला होता आणि भाजपचा येथे विजय झाला होता. त्याचवेळी, काँग्रेसने तेलंगणामध्ये केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवला.





