पिंपरी | काँग्रेसकडून आयुक्तांना खड्ड्यांची फोटो फ्रेम भेट देण्याचा

पिंपरी, (प्रतिनिधी) – काँग्रेस पक्षाच्या आघाडी संघटनांकडून खड्ड्यांचे फोटो असलेली फ्रेम देत आयुक्तांचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी आयुक्तांनी ही फ्रेम घेण्यास नकार देत निघून जाणे पसंत केले. शुक्रवारी (दि.16) दुपारी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली.
शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारत द्वारा जवळील पायर्यांवर काँग्रेसच्या युवक काँग्रेस, महिला काँग्रेस आणि एनएसयूआयच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून शहरात असलेल्या खड्ड्यांमुळे आणि सर्वत्र नागरिकांच्या झालेल्या गैरसोयींच्या निषेधार्थ फ्रेम भेट आंदोलन करण्यात आले.
खड्ड्यांच्या या विषयाकडे तत्काळ लक्ष वेधून योग्य उपाय योजना व्हाव्या यासाठी शहरातील विविध ठिकाणी असलेल्या खड्ड्यांचे फोटो एकत्रित एका फ्रेम वर घेऊन ती फोटो फ्रेम आयुक्तांना भेट देण्यासाठी कार्यकर्ते गेल्या 16 दिवसांपासून प्रयत्न करत होते.
मात्र आयुक्त त्यांना सातत्याने भेट देणे टाळत होते या पार्श्वभूमीवर आज थेट आयुक्तांना गाठत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने फ्रेम भेट देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी ते नाकारत तत्काळ निघून जाणे पसंत केले.





