लोकसभेसाठी कॉंग्रेसने महाराष्ट्रात आघाडी करावी

प्रशांत किशोर कॉंग्रेस नेत्यांना पुन्हा भेटणार
नवी दिल्ली – लोकसभेची आगामी निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्यासाठी कॉंग्रेसला तयार करण्याचे काम प्रशांत किशोर करीत असल्याची चर्चा आहे. प्रशांत किशोर उद्या, शुक्रवारी 600 स्लाईडचे प्रेझेंटेशन घेऊन कॉंग्रेसच्या नेत्यांना भेटणार आहेत.
कॉंग्रेसमधील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पिके यांनी अलीकडेच 60 स्लाईडचे प्रेंझेटेशन सादर केले होते. आता 600 स्लाईडचे प्रेझेंटेशन सादर करणार आहेत.
2024 मधील लोकसभेची निवडणूक पूर्ण दमाने लढावी यासाठी प्रशांत किशोर कॉंग्रेसला तयार करण्याचे काम करीत आहेत. यासाठी ते नवनवीन कल्पना सुचवित आहेत. सूत्रानुसार, 2024 मध्ये कॉंग्रेसने उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशा यासारख्या राज्यांमध्ये स्वबळावर निवडणूक लढविण्याचा सल्ला दिला आहे.
तर, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल यासारख्या राज्यांत आघाडी करून निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे, असे सुचविले आहे. कॉंग्रेसने आतापासून 370 जागांवर आपले लक्ष केंद्रित करायला पाहिजे आणि त्यावर काम करायला पाहिजे, असे सुचविण्यात आल्याची प्राथमिक माहिती समजते.





