कॉंग्रेसने केरळसाठी स्थापन केली निवडणूक समिती; अँटनी, थरूर यांचा 40 सदस्यांमध्ये समावेश

नवी दिल्ली – केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कॉंग्रेस पक्ष सज्ज झाला आहे. त्यातून पक्षाने मंगळवारी 40 सदस्यीय निवडणूक समितीची स्थापना केली.
कॉंग्रेसने निवडणूक समितीत केरळमधील बहुतांश प्रमुख नेत्यांना स्थान दिले आहे. त्यामध्ये ए.के.अँटनी, शशी थरूर, वायलर रवी, के.व्ही.थॉमस या माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.
माजी मुख्यमंत्री ओमन चंडी, प्रदेशाध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन, विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांच्याबरोबरच पी.जे.कुरियन, के.सी.वेणुगोपाल, पी.सी.चाको आणि के.सुरेश या ज्येष्ठ नेत्यांनाही सदस्य बनवण्यात आले आहे. पश्चिम बंगाल, तामीळनाडू, आसाम या राज्यांबरोबरच केरळमध्ये एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक होईल.
बंगालमध्ये कॉंग्रेसची डाव्या पक्षांबरोबर हातमिळवणी निश्चित झाली आहे. मात्र, केरळमध्ये कॉंग्रेस आणि डावे पक्ष प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत. त्या राज्यात सध्या डाव्या पक्षांची आघाडी सत्तेवर आहे. तर कॉंग्रेस प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे.



