नवी दिल्ली : मूळची केरळची रहिवासी असणाऱ्या निमिषा प्रिया या परिचारिकेला येमेनमध्ये फाशी दिली जाण्याची शक्यता आहे. तिला वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती कॉंग्रेसने त्यांना पत्राद्वारे केली आहे. येमेनमधील व्यावसायिक भागीदाराच्या हत्येप्रकरणी त्या देशात निमिषाला २०२० यावर्षी दोषी ठरवण्यात आले. तिला ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी १६ जुलैला होणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे निमिषाला वाचवण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवरून तातडीने पाऊले उचलली जावीत, अशी आग्रही मागणी केली जात आहे. अशात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी.वेणुगोपाल यांनी मोदींना पत्र पाठवले आहे. त्यामधून निमिषाच्या शिक्षेची अंमलबजावणी रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे साकडे घालण्यात आले आहे. परदेशी भूमीतील अकल्पनीय क्रौर्याची निमिषा शिकार ठरली. तिला ठोठावण्यात आलेली फाशीची शिक्षा म्हणजे न्यायाची गंभीर थट्टा आहे. तिच्या सुटकेसाठी कुटूंबीयांनी हत्या झालेल्या व्यावसायिक भागीदाराच्या कुटूंबीयांशी संपर्क साधून वाटाघाटींचा प्रयत्न केला. मात्र, येमेनमधील नागरी युद्ध आणि इतर अंतर्गत बाबींमुळे त्या प्रयत्नात अडथळे आले, असे वेणुगोपाल यांनी पत्रात नमूद केले. भाकपच्या नेत्यांनीही तशाच प्रकारचे साकडे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांना घातले. निमिषाला ठोठावण्यात आलेल्या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी शक्य त्या राजनैतिक आणि मानवतावादी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन जयशंकर यांना करण्यात आले.