Narendra Modi : मोदींच्या मतदारसंघातील निकालावर कॉंग्रेसचे प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली : निवडणूक अनियमितांचा आरोप लावून धरणाऱ्या कॉंग्रेसने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातील निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत बनावट मतदारांच्या आधारे मोदी वाराणसीतून विजय मिळवू शकले, असा सनसनाटी दावा त्या पक्षाने केला. कथित निवडणूक अनियमितता, मतचोरीवरून आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तप्त बनले आहे.
अशात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेडा यांनी पत्रकार परिषद घेत वाराणसी मतदारसंघाचा मुद्दा उपस्थित केला. मागील वर्षीच्या निवडणुकीत वाराणसीतून मोदींंचा पराभव होण्यासारखी स्थिती होती. मात्र, त्यांना बनावट मतदारांचा बुस्टर डोस मिळाला. आम्हाला इलेक्ट्रॉनिक मतदार याद्या मिळाल्यास ते सिद्ध करता येऊ शकेल. तसेच, पंतप्रधानपदाची खुर्ची चोरून मोदी त्यावर बसले असल्याचे स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.
भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षांनी जिंकलेल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या ६ जागांवर मतदार नोंदणीत अनियमितता झाल्याचा आरोप केला. त्यावरूनही खेडा यांनी भाजपला घेरले. विरोधी पक्षांप्रमाणेच भाजपही एकप्रकारे निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. त्यातून मागील वर्षीची लोकसभा निवडणूक बनावट मतदार याद्यांवर आधारित असल्याचे स्पष्ट होते. ती निवडणूक रद्दबातल ठरवली जाऊ नये का, असा थेट सवाल त्यांनी केला.





