Congress Protest : पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसचे आंदोलन; पाकिस्तान मुर्दाबादच्या दिल्या घोषणा

मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात जीव गमावलेल्या निष्पाप नागरिकांना काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबईतील टिळक भवन येथील पक्ष कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच त्यानंतर कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी दहशतवादाचा नायनाट करा, अशा आशयाचे फलकही कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते.
निष्पाप नागरिकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा पूर्णपणे नाश व्हावा हीच माझ्यासह सर्व सामान्य भारतीयाची आज मागणी आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, संपूर्ण देशातच या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जात असून हल्ला करणाऱ्यांना जशास तसं उत्तर देण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.
कोल्हापुरात मुस्लिम संघटनांकडून निषेध
काश्मीरमध्ये झालेल्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर येथील ऐतिहासिक दसरा चौकात मुस्लिम संघटनांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात मुस्लिम महिला हातात फलक घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ज्यांनी हल्ला केला त्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. तसेच हिंदू-मुस्लिम यांच्यात मतभेद निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.





