छत्तीसगढमधील कॉंग्रेसचे कार्यालय जप्त; ईडीची कारवाई: एका आमदाराच्या मालमत्तेवरही टाच

नवी दिल्ली –छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्यातील कॉंग्रेसचे कार्यालय ईडीने शुक्रवारी जप्त केले. मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ती कारवाई करण्यात आली. संबंधित प्रकरणी माजी मंत्री आणि कॉंग्रेसचे विद्यमान आमदार कवासी लखमा यांच्या मालमत्तेवरही टाच आणण्यात आली.
छत्तीसगढमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. याआधी कॉंग्रेसची सत्ता असताना तब्बल २ हजार १०० कोटी रूपयांचा मद्य घोटाळा घडल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणी मनी लॉण्डरिंगशी संबंधित चौकशी ईडी करत आहे. तत्कालीन कॉंग्रेस सरकारमध्ये लखमा उत्पादन शुल्क मंत्री असताना वर्ष २०१९ ते २०२२ या कालावधीत तो घोटाळा झाला. त्यामुळे सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाले. मद्यविक्री विषयक धोरण बदलण्यात आल्याचा मोठा आर्थिक लाभ व्यापाऱ्यांच्या टोळीला झाला. त्याबदल्यात लखमा यांना दरमहा २ कोटी रूपये मिळायचे, असा दावा ईडीकडून करण्यात आला.
चौकशी हाती घेतल्यानंतर ईडीने मागील वर्षीच्या अखेरीस लखमा आणि त्यांच्या मुलाशी संबंधित ठिकाणी छापे टाकले. त्यानंतर लखमा यांना चालू वर्षीच्या प्रारंभी अटक करण्यात आली. आता कारवाई आणखी पुढे नेत ईडीने लखमा, त्यांच्या मुलाच्या मालमत्ता तसेच कॉंग्रेसचे कार्यालय जप्त केले. त्या सर्व मालमत्तांची एकूण किंमत सुमारे ६ कोटी रूपयांहून अधिक असल्याचे समजते. ईडीने प्रथमच एखाद्या राजकीय पक्षाची मालमत्ता जप्त करण्याची घडामोड घडली आहे.





