Pune District : काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रवादीच्या वाटेवर; जिल्ह्यात तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते घड्याळ बांधणार हाती

सोमेश्वरनगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षात मोठी फूट पडत असून अनेक वरिष्ठ पदाधिकारी व तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. या प्रवेशामुळे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा पुणे जिल्हा आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाची भक्कम पकड होती. २०१४ च्या मोदी लाटेतही जिल्ह्याने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. माजी आमदार संजय जगताप आणि संग्राम थोपटे यांनी या जिल्ह्यात काँग्रेसची ताकद टिकवून ठेवण्यासाठी मोठा प्रयत्न केला. मात्र, अलीकडेच या दोन्ही नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने जिल्हा काँग्रेसमधील कार्यकर्ते आणि पदाधिकारी संभ्रमात सापडले आहेत.
जगताप आणि थोपटे यांच्या पक्षांतराने काँग्रेस पक्षात अंतर्गत गटबाजी अधिक वाढली. नवीन जिल्हा अध्यक्षपदी श्रीरंग चव्हाण यांची नियुक्ती झाल्यानंतर संजय जगताप यांचे समर्थक नाराज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेते आणि तालुकाध्यक्षांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या घडामोडींमुळे पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची अवस्था डळमळीत झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यामुळे मोठी बळकटी मिळाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ही काँग्रेससाठी मोठी राजकीय धक्का ठरू शकतो.
हे पदाधिकारी जाणार राष्ट्रवादीत
बारामती लोकसभा काँग्रेस कमिटी अध्यक्ष लहूअण्णा निवंगुणे, जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष संग्राम मोहोळ, प्रदेश प्रतिनिधी निखिल कवीश्वर, जिल्हा सरचिटणीस पृथ्वीराज पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अवधूत माने, जिल्हा युवक अध्यक्ष उमेश पवार, इंदापूर तालुकाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, बारामती तालुकाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, मावळ तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, शिरूर तालुकाध्यक्ष वैभव यादव, आंबेगाव तालुकाध्यक्ष राजू इनामदार, हवेली तालुकाध्यक्ष सचिन बराटे, खडकवासला युवक अध्यक्ष सागर मारणे, खडकवासला विधानसभा अध्यक्ष उमेश कोकरे, दौंड विधानसभा अध्यक्ष विठ्ठलराव दोरगे यांचा समावेश आहे.
लवकरच प्रवेशसोहळा
या सर्वांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लवकरच प्रवेश होणार असून त्याची तारीख निश्चितीच्या टप्प्यात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. बारामती तालुका काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पक्ष प्रवेशाची तारीख मागितली आहे.





