47 वर्षांनी बदलणार काँग्रेसचा पत्ता! नवीन मुख्यालयाला दिले ‘या’ नेत्याचे नाव, कधी होणार उद्घाटन?

Congress Party New Headquarter: देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा पत्ता लवकरच बदलणार आहे. काँग्रेसने भाजपच्या पावलांवर पाऊल टाकत नवीन राष्ट्रीय मुख्यालय तयार केले आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या मुख्यालयाचा पत्ता 24, अकबर रोड हा होता. मात्र, आता लवकरच काँग्रेसचे नेते नवीन ठिकाणी काम करताना पाहायला मिळतील.
काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता आता 24, अकबर रोडवरून बदलून नवीन दिल्लीतील 9अ, कोटला रोड असेल. 1978 मध्ये पासून 24, अकबर रोड हे काँग्रेसचे मुख्यालय होते. नवीन मुख्यालयाला इंदिरा गांधी भवन असे नाव देण्यात आले आहे. काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे. सोबतच, मुख्यालयाचे उद्घाटन कधी होणार आहे, हे देखील सांगितले.
It is time for us to move ahead with the times and embrace the new!
On 15 January, 2025 at 10am, in the esteemed presence of INC President Sh. Mallikarjun @kharge ji and LOP Sh. @RahulGandhi ji, Hon’ble CPP Chairperson Smt. Sonia Gandhi ji will inaugurate the new AICC…
— K C Venugopal (@kcvenugopalmp) January 7, 2025
केसी वेणुगोपाल यांनी माहिती दिली की, 15 जानेवारीला सकाळी 10 वाजता नवीन मुख्यालयाचे उद्घाटन केले जाईल. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा सोनिया गांधीसह इतर नेत्यांच्या उपस्थित उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडेल. याशिवाय, काँग्रेसच्या इतर प्रमुख नेत्यांना देखील या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
नेत्यांच्या गरजा लक्षात घेऊन नवीन मुख्यालय तयार करण्यात आले आहे. येथे सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा उपलब्ध असतील. आता येथूनच पक्षाचे कामकाज चालणार आहे. रिपोर्टनुसार, नवीन मुख्यालय तयार झाले असले तरीही मागील 47 वर्षांपासून मुख्यालय असलेले 24, अकबर रोड देखील काँग्रेस सोडणार नाही.
दरम्यान, भाजपने देखील काही वर्षांपूर्वी नवीन मुख्यालय तयार केले होते. आधी भाजपचे मुख्यालय 11, अशोक रोड होते, मात्र, फेब्रुवारी 2018 मध्ये 6अ, दीनदयाळ रोड या ठिकाणी मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.





