Congress : काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्याला ‘हे’ 2 मोठे नेते गैरहजर

मुंबई : काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. आजच्या या पदग्रहण सोहळ्यात काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून पदाची सू्त्रे हाती घेतली. तर दुसरीकडे या सोहळ्याला काँग्रेसचे २ मोठे नेते गैरहजर होते. याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
‘हे’ 2 नेते गैरहजर
हर्षवर्धन सपकाळ यांच्या पदग्रहण सोहळ्यात काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि आमदार विश्वजीत कदम हे दोन नेते अनुपस्थित राहिले. या दोघांचीही नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत होती. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण आले आहे.
नाना पटोले यांच्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू होती. यामध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वड्डेटीवार, विश्वजीत कदम, सतेज पाटील, अमित देशमुख अशी नावे चर्चेत होती. यात सतेज पाटील यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, यातील काहींनी प्रदेशाध्यक्षपदासाठी नकार दिला.
काँग्रेसने दिले स्पष्टीकरण
सतेज पाटील आणि विश्वजीत कदम यांच्या अनुपस्थितीबाबत काँग्रेसकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील यांचे बंधू संजय पाटील यांच्या 61 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोल्हापूरात पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत. त्यामुळे सतेज पाटील अनुपस्थित आहेत. यासंदर्भात त्यांनी प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना कल्पना दिली असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. तर, आमदार विश्वजीत कदम यांच्या चुलत बंधूंचे निधन झाल्यामुळे ते आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.





