मोठी बातमी…! लग्नाच्या आदल्या दिवशी काँग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता; अमरावतीत खळबळ

अमरावती : अमरावती जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. आज ज्या मुलाचं लग्न होतं, तो मुलगा काल (दि.13) बेपत्ता झाला आहे. विशेष म्हणजे हा मुलगा अमरावतीतील काँग्रेस नेत्याचा आहे. या प्रकरणी अमरावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्न एक दिवसांवर असताना मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अधिकची माहिती अशी की, वैभव मोहोड (वय 30) असं बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. वैभव हा काँग्रेसचे नेते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा असून शिवाजी महाविद्यालयात वैभव लिपिक म्हणून कार्यरत आहे. याप्रकरणी वैभव मोहोड याचे वडील हरिभाऊ मोहोड यांनी अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
नेमकं काय घडलं?
वैभव हा मंगळवारी सकाळी सामान आणायला बाहेर जातो असं सांगून घराबाहेर पडला होता. मात्र, बराचवेळ झाला तरी वैभव घरी परतला नव्हता. वैभव घरी न परतल्याने त्याच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, बेपत्ता होण्यापूर्वी वैभवने सकाळीच एटीएममधून 40 हजार रुपयांची रक्कम काढली होती.
त्यामुळं हे प्रकरण अधिक गुंतागुतीच झालं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास फ्रेजरपुरा पोलिस करत आहेत. ऐन लग्नाच्या एक दिवस आधी मोहोड यांचा मुलगा बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमरावती पोलिसांनी वैभव मोहोड यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. हरिभाऊ मोहोड हे काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत विविध पदांवर काम केले होते.
हरिभाऊ मोहोड हे जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. त्यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिवपदी देखील करण्यात आली होती. हरिभाऊ मोहोड हे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचे कट्टर समर्थक मानले जातात. अभ्यासू नेते म्हणून हरिभाऊ मोहोड यांची ओळख आहे.





