‘पेशवाईने पुन्हा शिवाजी महाराजांचा अपमान केला’; पीएम मोदींच्या माफीनंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया..

Nana Patole on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यांनी सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर आज (दि.30) माफी मागितली आहे. मी शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो, अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली. यावेळी पंतप्रधानांनी शिवभक्तांचीही माफी मागितली. ते पालघरमध्ये बोलत होते. दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या माफीनंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हा प्रश्न माफीने सुटणार नाही – नाना पटोले
नाना पटोले म्हणाले, पंतप्रधानांनी माफी मागून त्यांनी चूक केलेली आहे हे मान्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या पेशवाई ने पुन्हा शिवाजी महाराजांचा अपमान केला. माफी मागण्याची काय गरज पडली. त्यांनी चूक केली हे त्यांनी मान्य केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जेव्हा तिथं प्रतिमा मांडली गेली, ते फाउंडेशन बरोबर होतं की नाही? मूर्ती बरोबर आहे की नाही? सांस्कृतिक संचालकांनी त्याचं प्रमाणपत्र दिलं होतं की नाही? हे प्रधानमंत्री म्हणून त्यांनी बघायला पाहिजे होतं. विभागांनी पुतळ्याबाबत सर्व काही बघायला पाहिजे होतं.
महाराजांचा अपमान हे पेशव्यांच्या काळात सुद्धा केला जात होता. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या पेशवाईने पुन्हा शिवाजी महाराजांचा अपमान केला. हा प्रश्न माफीने सुटणार नाही. नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच लावली आहे. यांनी सत्तेतून बाहेर व्हावं नाहीतर महाराष्ट्रातील जनता यांना सत्तेतून बाहेर खेचल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी टीकाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.
पायावर मस्तक ठेवून माफी मागतो – पंतप्रधान
मला पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित केल्यानंतर मी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर जाऊन प्रार्थना केली होती. एक भक्त आपल्या आराध्य दैवताची प्रार्थन करतो, तसा मी राष्ट्रसेवेच्या यात्रेला प्रारंभ केला होता. काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात जे काही घडलं ते माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक नाव नाही, फक्त एक राजा नाही, तर शिवाजी महाराज आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत. आज मी मस्तक झुकवून मी माझं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या पायावर मस्तक ठेवून माफी मागतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
पीएम मोदींची मविआवर टीका –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदराचा भूमीपूजनाचा सोहळा पार पडला. यामुळे देशाचा व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. यासाठी तब्बल 76000 कोटी खर्च करण्यात येणार आहे. या कार्यक्रमावेळी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकासआघाडीवर जोरदार हल्लाबोल चढवला. “महाराष्ट्राचा विकास हे माझं प्राधान्य आहे. आज मेक इन इंडियाचा लाभ महाराष्ट्राला होत आहे. मात्र त्या अडीच वर्षात (मविआ सत्ता) या ठिकाणी कोणतंही काम झालं नाही”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावणारे हे लोक कोण?
एकट्या या प्रकल्पाने या ठिकाणी अनेक लाख कोटीची गुंतवणूक येणार आहे. १२ लाख रोजगार येणार आहे. या विकासाला कुणाचा विरोध होता. महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावणारे हे कोण लोक होते? राज्यातील तरुणांना रोजगार मिळण्यास कुणाचा आक्षेप होता? आधीच्या सरकारने हे काम पुढे का नाही नेलं? ही गोष्ट राज्यातील लोकांनी कधीच विसरू नये. खरं तर काही लोकांना महाराष्ट्राला मागास ठेवायचं आहे. पण आमचं महायुतीचं सरकार राज्याला देशात सर्वात पुढे न्यायचं आहे, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले.





