कॉंग्रेस नेत्या करुणा शुक्ला यांचे निधन

रायपुर, दि. 27 – कॉंग्रेस नेत्या व माजी खासदार करुणा शुक्ला यांचे आज करोनामुळे रायपूरमध्ये निधन झाले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या त्या भाची होत. त्यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथेच त्यांचे सोमवारी रात्री निधन झाले.
70 वर्षीय करुणा शुक्ला या चौदाव्या लोकसभेच्या सदस्य होत्या. त्या छत्तीसगडमधील जांगीर चंपा मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. त्यांनी सन 2013 मध्ये भाजपला रामराम ठोकला होता. त्या 32 वर्ष भाजपचे कार्य करीत होत्या पण सन 2014 ला त्यांनी भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
सन 2018 ला त्यांनी माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या विरोधात राजनांदगाव मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती पण त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यांच्या निधनाबद्दल छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दुःख व्यक्त केले आहे.





