“शरद पवार फक्त नमस्कार करत फिरले तरी राष्ट्रवादी पक्ष उभा राहील” काँग्रेस नेत्याने व्यक्त केला विश्वास

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फुट पडली असून दोन गट पडले आहेत. यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पुन्हा पक्ष उभा करतील. तसेच त्यांनी पक्ष उभारणीसाठी महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात केली आहे, असे विधान कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
यासंदर्भात त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाष्य केले आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले, शरद पवार यांना काही वेगळे करण्याची गरज नाही. ते फक्त नमस्कार करत फिरले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष उभा राहील. 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगला निकाल आणतील. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचा एकमेकांच्या मदतीने चांगला निकाल येईल, ही वस्तुस्थिती असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शरद पवारांनी कॉंग्रेसमध्ये येऊन राजकारण करावे का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, त्यांनी आजपर्यंत स्वातंत्रपणे राजकारण केले आहे. कॉंग्रेस आणि शरद पवार यांचे विचार वेगळे नाहीत. फक्त दोन वेगळे पक्ष आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आज ज्या पद्धतीने आम्ही चाललो आहोत, त्यातून यश नक्कीच मिळवू.
अजित पवारांच्या बंडखोरीबाबत ते म्हणाले की, काहीतरी शिजत आहे, याचा वास आम्हाला येत होता. कारण, महाविकास आघाडी म्हणून आम्ही खूप चांगले होतो. वज्रमूठ सभेमुळे लोकांमध्ये उर्जा निर्माण झाली होती. तसेच त्यावेळी झालेल्या सर्व्हेत महाविकास आघाडीला लोकसभेच्या 38 जागा आणि विधानसभेला 180 जागा मिळत असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळे भाजपाकडे आघाडी तोडण्याशिवाय पर्याय नव्हता, असा दावाही थोरात यांनी यावेळी केला.





