अमित देशमुख यांची राणा जगजितसिंह यांच्यावर शायराना अंदाजात टीका; म्हणाले ‘मुझको राणाजी माफ करना गलती…’

तुळजापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आता दिवसेंदिवस रंगत येताना दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करताना दिसत आहेत.राजकारणात या गोष्टी नॉर्मल आहेत. मात्र यंदाची निवडणूक खूप वेगळी असणार आहे. यादरम्यान तुळजापुरात काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी गाण्याचे सूर छेडत भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधला.
काय म्हणाले अमित देशमुख?
काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी तुळजापूरमधील प्रचारसभेत गाणी म्हणत राणा जगजीतसिंह पाटील यांच्यावर टीका केली. “लोकसभेला घड्याळ घेऊन उभे होते. आता कमळ घेऊन उभे आहेत. त्यामुळे लोक आता म्हणत आहेत पाटील गावाकडे चला”, असा टोला अमित देशमुख यांनी लगावला. “यावेळी ते मत मागायला आले की तुम्ही त्यांना म्हणा, मुझको राणाजी माफ करना गलती थारेसे हो गई”, असं गाणं म्हणत अमित देशमुख यांनी राणा पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
मविआच्या उमेदवाराला निवडून देण्याचे केले आवाहन
“स्वर्गीय विलासराव देशमुख की बात पर शरदचंद्र पवार की बात पर उद्धव ठाकरे की बात पर मत देना काँग्रेस के हातपर”, असे यमक जुळवून देशमुख यांनी तुळजापूरमधील उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन यावेळी केले. त्यांच्या या शायराना अंदाजाने उपस्थित लोकांना काही काळ विलासराव देशमुख यांची आठवण आल्याचा प्रत्यय आला.





