कृषी कायद्यांविरोधात ‘सत्याग्रह’; कॉंग्रेसच्या राज्यव्यापी आंदोलनास सुरूवात

सांगली/वर्धा – केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात कॉंग्रेसच्या राज्यव्यापी आंदोलनास आजपासून सुरूवात झाली. मोदी सरकारने तीन नवे कृषी कायदे तयार केले आहेत. या कायद्यांना कॉंग्रेससह देशातील काही राज्यांसह शेतकरी संघटनांनी विरोध दर्शविला आहे.
या कायद्यांमुळे कृषी क्षेत्रही भांडवलदारांच्या किंवा कॉर्पोरेट कुटुंबाच्या हातात जाईल. याचा शेतकऱ्यांना फटका बसेल, असे म्हणत कॉंग्रेसने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.
आंदोलनामध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, महिला कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष चारुलता टोकस इत्यादी नेते उपस्थित होते.
सांगलीत कॉंगेस भवनसमोर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा या मागणीसाठी कॉंग्रेसचे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, कॉंगेसचे युवा नेते विशाल पाटील, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी नेते आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.
नांदेड येथे केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार कायद्यांच्या विरोधात किसान अधिकार दिवस पाळला जातो आहे. यानिमित्त सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली. त्यांनी ट्रॅक्टरवर बसून आंदोलनाचे नेतृत्व केले.त्यानंतर सत्याग्रह देखील करण्यात आला.
केंद्राला शेतकऱ्यांची ऍलर्जी – विश्वजित कदम
दिल्लीतील केंद्र सरकार हे काही मोजक्या मोठ्या उद्योगपतींच्या साठी काम करत आहे. या सरकारला ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांची ऍलर्जी आहे, अशी टीका मंत्री विश्वजित कदम यांनी केली आहे.
तसेच राज्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाईबाबत बोलताना राज्य सरकारने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम केलेले आहे. दहा हजार कोटींची मदत राज्य शासनाने जाहीर केलेली आहे आणि आता केंद्रानेही आपले कर्तव्य पार पाडावे, अशी मागणी विश्वजीत कदम यांनी केली आहे.





