“काँग्रेसचा सत्यानाश झाला…”; विनेश फोगाटचा विजय होताच ब्रिजभूषण शरण सिंह यांची प्रतिक्रिया

Haryana Election Results 2024 | हरियाणाच्या जुलाना मतदार संघातून कुस्तीपटू विनेश फोगाटचा विजय झाला आहे. भाजपच्या योगेश बैरागी यांच्यावर मात करत विनेश फोगाट यांनी विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. विनेश फोगाट यांना एकूण 65,080 मते मिळाली, तर योगेश बैरागी यांना 59,065 मते मिळाली. याशिवाय सुरेंद्र लाथेर यांना 10,158 मते मिळाली. अशा प्रकारे विनेश फोगाट 6015 मतांनी विजयी झाल्या आहेत.
ब्रिजभूषण शरण सिंह काय म्हणाले?
विनेश फोगाट यांच्या विजयावर कैसरगंजमधील भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. डब्ल्यूएफआयचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले की, “विनेश फोगाट जिंकली परंतु ती जिथे जिथे पाऊल ठेवते तिथे सत्यानाश होतो, ती काँग्रेसमध्ये गेली आणि काँग्रेसचा सत्यानाश झाला. एक्झिट पोल काँग्रेसचे सरकार बनणार असल्याचे दाखवत होते, पण हरियाणामध्ये एक्झिट पोल पूर्णपणे चुकीचा ठरला आणि आता तिथे भारतीय जनता पक्षाचे सरकार बनत आहे.”
जम्मू-काश्मीर निवडणुकीच्या निकालाबाबत ब्रिजभूषण शरण सिंह यांनी ” भारतीय जनता पक्षाकडून तेथे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, जो यशस्वी झाला नाही,” असे सांगितले.
दरम्यान, हरियाणा विधानसभा निवडणुकीत विनेश फोगट यांना जुलाना जागेवर 65080 मते मिळाली आणि भाजपचे उमेदवार योगेश कुमार 59065 मते मिळवून दुसऱ्या स्थानावर आहेत. अशाप्रकारे जुलाना जागेवर काँग्रेसच्या उमेदवार विनेश फोगट यांनी 6015 मतांनी विजय मिळवला.





