Rajiv Gandhi Olympic Games 2023 : राजस्थान सरकारच्या क्रीडा उपक्रमाला अभुतपूर्व प्रतिसाद; स्पर्धेत 55 लाख…

जयपूर – राजस्थान सरकारने ग्रामीण भागातील क्रीडापटूूंसाठी राजीव गांधी ग्रामीण ऑलिम्पीक स्पर्धा गेल्या वर्षी आयोंजित केल्या होत्या. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून राज्य सरकारने या स्पर्धांची शहरी भागातही व्याप्ती वाढवली आहे.
ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांमध्ये होणाऱ्या या स्पर्धांमध्ये यंदा सुमारे 55 लाख स्पर्धकांनी आपली नावे नोंदवली आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा हा एक मेगा स्पोट्स इव्हेंट ठरणार आहे. या क्रीडा स्पर्धा 23 जून रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवसापासून सुरू होतील आणि 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनी समाप्त होतील.
जवळपास 55 लाख खेळाडूंनी या खेळांसाठी नोंदणी केली आहे, सरकारने यासाठी 50 लाखांचे उद्दीष्ठ ठेवले होते, पण त्यापेक्षाही अधिक प्रतिसाद मिळाला आहे. सरकार या कार्यक्रमाद्वारे आपल्या योजना आणि कार्यक्रमांना प्रसिद्धी देण्याची आणि सर्व वयोगटातील सहभागींमध्ये खेळाच्या भावनेला प्रोत्साहन देण्याची योजना आखत आहे.
कबड्डी, टेनिस बॉल क्रिकेट, खो खो, व्हॉलीबॉल आणि फुटबॉल या क्रीडा प्रकारात या स्पर्धा होतील. ऍथलेटिक्स आणि बास्केटबॉल शहरी केंद्रांपुरतेच असतील.यासाठी खेळाडूंनी केलेली ही एक विक्रमी नोंदणी असून जगातील कोणत्याही क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंची ही सर्वाधिक संख्या असेल, असा दावा त्यांनी केला.




