हरियाणात कॉंग्रेसचे अजय माकन यांना पराभवाचा धक्का

चंदीगड – हरियाणातून राज्यसभेवर पाठवल्या जाणाऱ्या दोन जागांच्या निवडणुकीत भाजपचे कृष्णलाल पनवार आणि त्यांनी पाठिंबा दिलेले अपेक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा, हे विजयी झाले आहेत. कॉंग्रेसचे उमेदवार अजय माकन यांना मात्र तेथे पराभव पत्करावा लागला आहे. येथील निवडणुकही वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.
त्या विषयी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार करण्यात आल्याने येथील मतमोजणी उशिरा सुरू झाली. आणि मध्यरात्री उशिरा निकाल जाहीर करण्यात आला. निवडणूक आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पनवार यांना 36 मते मिळाली, तर शर्मा यांना प्रथम पसंतीची 23 मते मिळाली भाजपच्या सहा सदस्यांनीही त्यांना मतदान केल्याने त्यांना पहिल्या पसंतीची एकूण 29 मते मिळाली.
कॉंग्रेसच्या एका आमदाराने क्रॉस वोटिंग केले आणि पक्षाच्या दुसऱ्या आमदाराचे मत अवैध घोषित करण्यात आल्याने कॉंग्रेस उमेदवाराला पराभूत व्हावे लागले. या मतदान प्रक्रियेविषयी दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर आक्षेप घेण्यात आले होते. त्यावर निर्णय देण्यास विलंब लागल्याने येथील मतमोजणी लांबली होती.





