Lok Sabha Election 2024 : कॉंग्रेसची पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात तक्रार; कठोर कारवाईची केली मागणी

Congress | Narendra Modi | Lok Sabha Election 2024 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राजस्थानच्या बांसवाडा येथील प्रचारसभेत बोलताना कॉंग्रेस पक्षाच्या संदर्भात एक विधान केले होते. त्याला कॉंग्रेस पक्षाने आक्षेप घेतला असून निवडणूक आयोगाने पंतप्रधानांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
पंतप्रधानांनी विभाजनवादी आणि दुर्भावनापूर्ण वक्तव्य करून निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केले असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे.
कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने आज निवडणूक आयोगाची भेट घेऊन यासंदर्भात तक्रार दाखल केली.
अभिषेक मनू सिंघवी, गुरूदीप सप्पल आदी नेत्यांचा शिष्टमंडळात समावेश होता. सिंघवी म्हणाले की आम्ही १७ तक्रारी दाखल केल्या आहेत. सगळ्या अत्यंत गंभीर असून संविधानाच्या मूल सिध्दांतांवर आघात करण्याच्या संदर्भातील आहेत.
आयोगाकडून लवकरात लवकर ठोस पाउले उचलली जातील अशी अपेक्षा आम्ही करतो. सिंघवी म्हणाले की पंतप्रधान हे एका पदावर बसलेले व्यक्ती असून त्यांनी जन प्रतिनिधी कायद्याच्या कलम १२३ चे उल्लंघन केले आहे.
भारताच्या राज्यघटनेच्या अस्मितेवरच त्यांनी प्रहार केला आहे. देश, संविधान, पंतप्रधान पद आणि निवडणूक आयोग यांच्या विश्वासार्हतेचा हा प्रश्न आहे. सर्वसामान्य व्यक्तीच्या संदर्भात जे केले जाते त्याप्रमाणे निर्बंध घालावे लागतील.
येथे देशाच्या राज्यघटनेचा प्रश्न आहे त्यामुळे कोणीही व्यक्ती कोणत्याही पदावर असली तरी कारवाई केली जावी. देशात जर कॉंग्रेसचे सरकार आले तर ते देशाची संपत्ती एका समुदायाला वाटून टाकतील अशा आशयाचे विधान पंतप्रधानांनी केले होते. त्यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केलेल्या एका विधानाच्या अनुशंगाने हे वक्तव्य केले होते.





