Congress Committee : प्रदेश काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मदतीला मोठी टीम देण्यात आली आहे. राजकीय व्यवहार समितीमध्ये ३६ वरिष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. कार्यकारिणीमध्ये १६ वरिष्ठ उपाध्यक्ष, ३८ उपाध्यक्ष, ५ वरिष्ठ प्रवक्ते, १०८ सरचिटणीस, ९५ सचिव आणि ८७ सदस्यांचा समावेश आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष होऊन सहा महिने झाले तरी नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर झालेली नव्हती. अखेर मंगळवारी रात्री उशिरा कार्यकारिणीची यादी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या अध्यक्षतेखालील राजकीय व्यवहार समितीत ३६ वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक, अविनाश पांडे, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खा. वर्षा गायकवाड, सुनील केदार, नितीन राऊत, अमित देशमुख, नसीम खान आदी नेत्यांचा समावेश आहे. अभय छाजेड यांची कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १६ जणांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यात अभिजित वंजारी, डॉ. प्रज्ञा सातव, सुनील देशमुख, कल्याण काळे, मोहन देशमुख, मुजफ्फर हुसेन, राजेंद्र मूळक, रणजीत कांबळे आदींचा समावेश आहे. तर ३८ जणांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.





