Lok Sabha Elections 2024 : कॉंग्रेस आम्हाला गृहीत धरू शकत नाही – तृणमूल कॉंग्रेस

नवी दिल्ली – कॉंग्रेस आम्हाला गृहीत धरू शकत नाही, अशा शब्दांत तृणमूल कॉंग्रेसने बुधवारी त्या पक्षाविषयीची भावना आणि नाराजी व्यक्त केली. त्यामुळे विरोधकांच्या संभाव्य ऐक्यासाठी आवश्यक असणाऱ्या कॉंग्रेस आणि तृणमूलमधील मनोमिलनाविषयीचा सस्पेन्स आणखी वाढला आहे.
कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी ईडी कार्यालयावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला. तसेच, ईडीला पत्र पाठवून अदानी उद्योगसमुहाच्या चौकशीची मागणी केली. मात्र, त्या विरोधी पक्षांमध्ये तृणमूलचा समावेश नव्हता. त्यामागचे कारण तृणमूलच्या सुत्रांनी स्पष्ट केले. त्यातून कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते अधिररंजन चौधरी यांच्या टीकेमुळे तृणमूल नाराज असल्याचे सूचित झाले.
पश्चिम बंगालमध्ये नुकतीच पोटनिवडणूक झाली. त्यासाठी प्रचार करताना चौधरी यांनी मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर टीकेची झोड उठवली. ममता, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी समुहाची हातमिळवणी असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचा संदर्भ तृणमूलच्या सुत्रांनी दिला. एकीकडे आमच्या नेतृत्वावर टीका करायची अन् दुसरीकडे आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करायची हे योग्य नाही, असे त्या सुत्रांनी नमूद केले.
Manish Sisodia : सिसोदियांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल; भ्रष्टाचाराचा ‘हा’ नवा आरोप
पुढील लोकसभा निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे. त्या निवडणुकीत भाजपसमोर तगडे आव्हान उभे करण्यासाठी एकत्र येण्याचा सूर विरोधक आळवत आहेत. प्रत्यक्षात, विरोधकांमध्ये धुसफूस, मतभेद असल्याचे दिसून येत आहे. कॉंग्रेस आणि तृणमूलमधील संबंधही विविध कारणांवरून आधीपासूनच ताणले गेले आहेत. त्यावर ताज्या घडामोडींनी एकप्रकारे शिक्कामोर्तबच केले.





