कॉंग्रेसने स्वीकारले जाहीर चर्चेचे निमंत्रण; मोदींच्या सहभागाचीही व्यक्त केली अपेक्षा

नवी दिल्ली –लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी न्यायाधीशांसह काही नामवंत व्यक्तींनी प्रमुख राजकीय पक्षांना जाहीर चर्चेचे निमंत्रण दिले. कॉंग्रेसने ते स्वीकारले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तशा चर्चेत सहभागी होण्याविषयी अपेक्षा व्यक्त केली.
एकाच मंचावर येऊन महत्वाच्या मुद्द्यांवर जाहीर करण्याचे निमंत्रण मोदी आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना देण्यात आले. ते निमंत्रण स्वीकारत असल्याचे राहुल यांनी सोशल मीडियातील पोस्टवरून नमूद केले. प्रमुख पक्षांनी एका मंचावरून आपले व्हिजन देशासमोर मांडण्याची बाब सशक्त लोकशाहीसाठी सकारात्मक पाऊल ठरेल. कॉंग्रेस पक्ष त्या पाऊलाचे स्वागत करतो.
संबधित निमंत्रणावर माझी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा झाली. जाहीर चर्चेत सहभागी होणे मला किंवा खर्गे यांना आवडेल. तशा स्वरूपाच्या चर्चेत पंतप्रधानांनीही सहभागी होण्याची देशाची अपेक्षा आहे. पंतप्रधानांनी सहमती दर्शवल्यास कळवावे, असे राहुल यांनी निमंत्रण पाठवणाऱ्यांस उद्देशून म्हटले. आता मोदी किंवा भाजपकडून निमंत्रणाविषयी काय प्रतिसाद दिला जातो याबाबत उत्सुकता आहे.





