Satyajeet Tambe : समृद्धी महामार्गावर चक्काजाम; आंदोलनादरम्यान गिरीश महाजनांचा फोन, सत्यजित तांबेंनी केली मोठी मागणी म्हणाले…
Satyajeet Tambe : या चक्काजाम आंदोलनात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार सत्यजित तांबे सहभागी झाले आहेत.

Satyajeet Tambe : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गात बदल करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. मूळ रेल्वे मार्गात बदल करण्यात आल्याने अहिल्यानगरकरांनी कडाकडून विरोध दर्शवला आहे.
या निर्णयाविरोधात आज सकाळी नऊ वाजल्यापासून समृद्धी महामार्गावर रास्तारोको आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या चक्काजाम आंदोलनात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार सत्यजित तांबे सहभागी झाले आहेत.
मोठ्या प्रमाणावर नागरिक देखील सहभागी झाल्याचे बघायला मिळत असून, पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू आहे. अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. एक ठिकाणी आमदार सत्यजित तांबे बोलत असताना त्यांना मंत्री गिरीज महाजन यांचा फोन आला. या फोनवरुन गिरीश महाजन यांनी मोठं आश्वासन दिले आहे.
फोनवरील संभाषणात सत्यजीत तांबेंनी केलेल्या मागणीवर गिरीश महाजन यांनी विचार करून निकाल ६० दिवसांत दिला जाईल असे आश्वासन दिले. मात्र, सत्यजित तांबे यांनी सरकारच्या प्रतिनिधींनी येथे येऊन लेखी आश्वासन द्यावे, अशी ठाम मागणी लावून धरली आहे.
नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?
“तुमचं म्हणणं ठीक आहे, कमिटी नेमलेली आहे. यावर आमच्या काही प्रमुख मागण्या असून नेमलेल्या कमिटीने ६० दिवसांत निकाल लावला पाहिजे. कमिटीने तांत्रिक मुद्दे न तपासता जनभावनेचा विचार केला पाहिजे.” अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली.
तांबेंच्या या मागणीवर बोलताना महाजन यांनी “नक्कीच याचा विचार होईल. मी मुख्यमंत्र्यांना सांगेन. ६० दिवसांच्या आत निकाल द्यायचा आहे. यावर सत्यजीत तांबे म्हणाले “जनसुनवाई झाली पाहिजे भाऊ… कमिटी गावोगावात आणि तालुक्यात आली पाहिजे. नक्की मी कमिटीला तसं सांगतो, असे आश्वासन गिरीश महाजन यांनी दिले.
याचवेळी आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील फोन आल्याचे सत्यजित तांबे यांनी सांगितले. ते म्हणाले “काल रात्री मला सीएम साहेबांचा फोन आला होता. त्यांनीही आश्वासन दिले आहे.” मात्र हे आंदोलन जनभावना पोहचण्यासाठी असल्याचे सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केले.
नेमकं आंदोलन कशासाठी?
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग पूर्वीच्याच मूळ आरेखानुसार करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निर्णयाच्या विरोधात सिन्नर, संगमनेर, अकोले, नाशिकमध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. केंद्र सरकार नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या हायस्पीड रेल्वेचा पुणे–चाकण–राजगुरुनगर–मंचर–नारायणगाव–आळेफाटा–संगमनेर–सिन्नर–नाशिक असा मूळ मार्ग बदलण्याचा निर्णय झाला आहे. रेल्वे मंत्रालयाने नाशिक-शिर्डी-पुणतांबा, अहिल्यानगर-चाकण या पर्यायी मार्गाचे सर्वेक्षण केले आहे. या मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मूळ मार्ग कायम ठेवावा, या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
United States: चीनच्या कृतीमुळे अमेरिकेचा भडका ; फिलीपिन्सला दिले पाठिंब्याचे आश्वासन





