युनिव्हर्सल स्कूलच्या फी वाढीवरून गोंधळ

सातारा, दि. 8 (प्रतिनिधी)-वर्ये (ता. सातारा) येथील युनिव्हर्सल स्कूलने लागू केलेल्या अतिरिक्त शुल्क वाढीच्या विरोधात मंगळवारी पालक आक्रमक झाले. शाळेच्या पिरवाडी येथील प्रशासन कार्यालयासमोर त्यांनी ठिय्या दिला.
शाळा व्यवस्थापनाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकांशी चर्चा न करताच दुपारी काढता पाय घेतल्याने एकच गोंधळ झाला. शुल्क भरण्याची ऐपत नसल्यास दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्या, अशी ताठर भूमिका शाळा प्रशासनाने घेतल्याने पालक संतप्त झाले. या संतापाचे पडसाद आज दिवसभर उमटत राहिले.
शाळेने सुरवातीच्या टप्प्यात सर्व इयत्तांचे पहिल्या एका सत्राचे पूर्ण पैसे भरून घेत सर्व खर्चाचा ताळेबंद सादर करण्याची ग्वाही पालक संघटनांना दिली होती. पुन्हा शुल्कवाढीचा आग्रह सुरु झाल्यावर पालक संघटनांनी शुल्कात 25 टक्के सवलत मिळण्याची मागणी लेखी पत्राने केली. मुख्याध्यापिका देशमुख व त्यांचे सहकारी पालकांचा आक्रमक पवित्रा पाहून तेथून गायब झाले. याप्रकरणी शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणतीच प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.





