पिंपरी | निवडणुकीत गावाला जाण्यासाठी परप्रांतीय मजुरांची घालमेल

कार्ला, {संजय हुलावळे} – देशात लोकशाहीचा उत्सव साजरा होत आहे. यात सर्वजण हिरीरीने सहभागी होऊन मतदान करत आपल्या आवडत्या उमेदवाराची निवड करणार आहे. मात्र, त्याचवेळी रोजगारासाठी परप्रांतातून मावळ तालुक्यात आलेल्या कामगारांना निव्वळ मतदानासाठी आपल्या राज्यात परत जाण्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असल्याने निवडणुकीबाबत त्यांची घालमेल सुरू आहे.
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी घरपोच मतदानाची सुविधा किंवा नोकरपेशा वर्गासाठी असलेली पोस्टल बॅलेट अशी कोणतीही व्यवस्था त्यांच्यासाठी नसल्याने हे परप्रांतीय कामगार मतदान कसे करतील? असा प्रश्न निर्माण होत आहे.
देशातील लोकशाही ही सर्वसामान्य मतदारांच्या मतदानावरच चालविली जाते. ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झाले आहे. अशा प्रत्येक व्यक्तीला मतदान करून आपल्या उमेदवाराची निवड करण्याचा हक्क मिळतो. यात महिला-पुरुष, युवक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि तृतीयपंथी व्यक्तींनासुद्धा हा जन्मजात अधिकार राज्य घटनेतून मिळाला आहे.
देशातील सरकारपासून राज्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हे सर्व मतदार मतदानाचा हक्क बजावतात, या निवडणुकीच्या वेळी मतदानाच्या ठिकाणी उपस्थित न राहू शकणारे नोकरदार लोकांसाठी पोस्टल बॅलटद्वारे मतदानाचा अधिकार बजावण्याची संधी मिळते. मात्र, गेल्या काही दशकांपासून शासकीय नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याने बरेच जण खासगी कंपनीत काम करत आहेत.
ते सुशिक्षित असल्याने मतदानासाठी प्रवास करून येऊ शकतात. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी परप्रांतात जाऊन फुटपाथवर वस्तूंची विक्री करणारे, हातगाडीवर कुल्फी आईसक्रीम व इतर पदार्थ विकणारे मात्र, फक्त मतदान करण्यासाठी लांबच्या प्रवासावर मोठा खर्च करण्याबाबत चिंतीत आहेत.
मावळ तालुक्यातील रस्त्यावर किरकोळ कामे करून दोन पैसे मिळणारे हजारो लोक आहेत. ते हंगामानुसार येतात व पाच-सहा महिन्यानंतर परत जातात. यातील कुल्फी, आईसक्रिम, रसवंती, आईस गोला विक्री असे हंगामी काम करणारे बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आदी प्रांतातून आलेले आहेत. बोअरवेल खोदण्यासाठी तामिळनाडूवरून मजूर आले आहेत.
मेहनतीचे काम करण्यासाठी छत्तीसगड आणि राजस्थानातील मजूर आलेले आहेत. मावळ तालुक्याच्या ठिकाणी त्यांचे उन्हाळ्यातील हंगामी काम सुरू झाले आहेत. अशावेळी निवडणुकीसाठी दोन दिवसांचा प्रवास करून गावाकडे जाणे त्यांच्या जीवावर येत आहे. याचप्रमाणे मजूर परप्रांतात गेलेले आहेत. त्यांनासुद्धा या निवडणुकीसाठी गावाला येऊन परत जाण्याचा खर्च करणे झेपणारे नाही.
विशेष म्हणजे हे सर्व असंघटित असल्याने त्यांची कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवारसुद्धा दखल घेत नाही. त्यामुळे त्यांना लांबचा प्रवास करताना शासकीय यंत्रणा किंवा राजकीय उमेदवारांची मदत मिळणे अशक्य दिसत आहे.
ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची
ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची करीत गावातील उमेदवार आपल्यालाच मतदान व्हावे यासाठी मतदारांच्या जाण्या-येण्याचा खर्च करतात. मात्र लोकसभा निवडणुकीत मतदार संघ मोठा असल्याने उमेदवार आणि गावातील राजकीय नेते इतर ठिकाणी कामासाठी गेलेल्या मतदारांना विचारत देखील नाहीत.





