भोर : भोर तालुक्यातील उत्रौली-वडगावडाळ येथील औद्योगिक वसाहत उभारणीबाबत बैठक घेण्यात आली होती. यावेळी काही ग्रामस्थांनी औद्योगिक वसाहत करायला विरोध दर्शवला असुन जमिनीवरील शिक्के काढण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. तर काही ग्रामस्थांनी वसाहतीसाठी सर्वेक्षण करायला संमती दिली. या बैठकीत गदारोळ झाल्याने बैठक संपवण्यात आली. काही दिवसांपूर्वी प्रस्तावित औद्योगिक वसाहतीच्या भूसंपादनासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे बैठक झाली. त्यावेळी दोन्ही गावातील शेतकरी उपस्थित होते. त्यावेळी काही शेतकऱ्यांनी औद्योगिक वसाहतीला विरोध केला होता. जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार औद्योगिक वसाहतीबाबत उत्रौली येथील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, उपविभागीय औद्योगिक वसाहत अधिकारी अर्चना पठारे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, नवनाथ शेटे, विलास शिवतरे, राजेंद्र शेटे व दोन्ही गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी औदयोगिक वसाहती संदर्भात उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी व औद्योगिक वसाहतीच्या अधिकारी अर्चना पठारे यांनी दोन्ही गावातील ग्रामस्थांना वसाहतीबाबत सविस्तर माहिती दिली. मात्र यापूर्वी सर्वेक्षण झाले होते. त्यावेळी ६७ टक्के लोकांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे पुन्हा सर्वेक्षण करू नये औद्योगिक वसाहतीला आमचा विरोध असून आमच्या जमिनीवरील शिक्के काढा आणि आमचा सातबारा कोरा करा, अशी घोषणाबाजी शेतकऱ्यांनी केली. यामुळे बैठकीत गोंधळ निर्माण झाला. गदारोळ झाल्याने बैठक संपवण्यात आली.