परीक्षांचे वेळापत्रक जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काही अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. ऑनलाइन परीक्षा सुरू होण्यासाठी आणखी 10 दिवसांचा अवधी आहे. मात्र, अजूनही परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध झालेले नाही. त्यामुळे आमची परीक्षा कधी होणार आहे, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडला आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने संपूर्ण परीक्षांचे वेळापत्रक तातडीने जाहीर करण्याची मागणी होत आहे.
विद्यापीठाने ऑनलाइन पद्धतीने येत्या 10 एप्रिलपासून परीक्षा सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यापूर्वी किमान महिनाभर आधीच वेळापत्रक प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे. परंतु, अजूनही संपूर्ण परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध न झाल्याने विद्यार्थी हवालदील झाले आहेत.
दरम्यान, प्रथम सत्र परीक्षांच्या उर्वरित अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर झालेले नाहीत. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यासाठी वेळापत्रक प्रसिद्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे संपूर्ण वेळापत्रक तातडीने जाहीर करणे गरजेचे आहे.





