युक्रेनच्या समर्थनार्थ युरोपातल्या देशांची ब्रिटनमध्ये परिषद

लंडन : युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी युरोपातल्या देशांची परिषद लंडनमध्ये होत असून ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्स्की यांना संरक्षणाची हमी दिली आहे. वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच्या चर्चेच्यावेळी झालेल्या खडाजंगीनंतर झेलेन्स्की ब्रिटनमध्ये दाखल झाले आहेत. अमेरिकेतल्या कटू अनुभवाच्या विपरीत झेलेन्स्की यांचे ब्रिटनमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. युरोपातल्या नेत्यांबरोबरच्या महत्वाच्या चर्चेपुर्वी झेलेन्स्की यांनी सांद्रिगाम येथे ब्रिटनचे राजे चार्ल्स यांची भेट घेतली.
स्टार्मर यांनी मात्र युक्रेन – रशिया युद्ध संपवण्यासाठी ट्रम्प प्रयत्न करतील, अशी आशा व्यक्त केली. या प्रदेशात स्थायी शांतता निर्माण व्हावी, असेच ट्रम्प यांना वाटत असावे. जर त्यांना तसे वाटत असेल, तर आपणही त्यांच्याशी सहमत असू, असेही स्टार्मर म्हणाले. रशियाविरुद्धच्या युक्रेनच्या ३ वर्षांच्या युद्धानंतर आता टर्निंग पॉइंट आला आहे. आमच्या मित्र राष्ट्रांसोबत भागीदारीत, आम्हाला अमेरिकेसोबत सतत चर्चा करण्याबरोबरच सुरक्षा हमींच्या युरोपीय घटकासाठी आमची तयारी तीव्र करावी लागेल. युक्रेनसाठी संरक्षणाची हमी देताना आपण एकत्रित राहून युरोपच्या सुरक्षितेचे रक्षण करावे आणि आपल्या भविष्याचे एकत्रितपणे रक्षण करावे, असेही स्टार्मर म्हणाले.
रशियाने बेकायदेशीरपणे छेडलेले युद्ध थांबवले जाईल आणि स्थायी शांतता स्थापन होईल. युक्रेनचे सार्वभौमत्व आणि सुरक्षिततेचेही रक्षण होईल असा मार्ग सापडेल, असा आपल्याला विश्वास वाटत असल्याचे झेलेन्स्की यांनी स्टार्मर यांच्याबरोबरच्या द्विपक्षीय चर्चेनंतर सांगितले. झेलेन्स्की यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा केली.
लंडनमधील युक्रेनवरील शिखर परिषदेत फ्रान्स, जर्मनी, डेन्मार्क, नेदरलँड्स, नॉर्वे, पोलंड, स्पेन, कॅनडा, फिनलंड, स्वीडन, चेक गणराज्य आणि रोमानियाचे नेतेही सहभागी झाले होते. तुर्कीचे परराष्ट्र मंत्री, नाटो सरचिटणीस आणि युरोपियन कमिशन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष देखील उपस्थित होते. अमेरिकेकडून युक्रेनला दिली जाणारी मदत रोखली जाण्याच्या धास्तीने गडबडून गेलेले युरोपातील नेते ब्रिटनमध्ये एकत्र आले आहेत. युरोप आणि अमेरिकेमध्ये निर्माण झालेली दरी दूर करण्याचा प्रयत्न कीर स्टार्मर करत आहेत.
युक्रेनला समर्थ बनवण्याच्या गरजेवर भर…
या परिषदेत युक्रेनला सक्षम करणे, सध्याची लष्करी मदत वाढवणे आणि रशियावर आर्थिक दबाव आणणे या मुद्यांवर भर देण्यात आला. युक्रेनमध्ये स्थायी शांतता प्रस्थापित करणे आणि भविष्यात रशियाकडून होणाऱ्या आक्रमणांना तोंड देण्यास समर्थ करण्यासाठी या उपाययोजनांची गरज असल्याचा निष्कर्ष चर्चेतून काढला गेला. त्याचबरोबर युक्रेनला ठोस सुरक्षा हमी देण्याचे नियोजन देखील यावेळी केले गेले.
युक्रेनला २.२६ अब्ज पौंडांचे कर्ज
ब्रिटनचे चॅन्सेलर राचेल रीव्हज आणि युक्रेनचे अर्थमंत्री सर्गेई मारचेंको यांच्यात युक्रेनला २.२६ अब्ज पौंडांचे कर्ज देण्याच्या ब्रिटन-युक्रेन द्विपक्षीय करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. रशियावर युरोपीय संघाकडून निर्बंध घातले गेल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या रशियाच्या मालमत्तांमधून मिळणाऱ्या नफ्यातून हे कर्ज दिले जाणार आहे. / निधीचा विनियोग युक्रेनचे लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी केला जाणार आहे.




