Satara : जुन्या वाहनांनाही हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची सक्ती

सातारा : जिल्ह्यासह राज्यातील सर्वच जुन्या वाहनांनाही आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची सक्ती करण्यात आली आहे. त्याची जबाबदारी तीन कंपन्यावर सोपविण्यात आली आहे. जानेवारी २०१९ पासून सर्व प्रकारच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. या प्लेट नसणाऱ्या वाहनांना ५ ते १० हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. नव्या वर्षापासून याबाबत काटेकोर अंमलबजावणी होणार आहे.
वाहनांची चोरी होऊ नये, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करता यावी यासाठी नवीन नियमानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आणि कलर कोटेड स्टिकर्स अनिवार्य केले आहेत. नवीन वर्षात जीएसटी, बॅकिंगसह अनेक नियमांत बदल होत आहेत. २०२५ मध्ये त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा आरटीओ विभागाने निर्णय घेतला आहे.
नंबरप्लेट वाहनाला लावल्यानंतर पुन्हा काढता येत नसून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने नंबरप्लेट बनविलेली असते. त्यामुळे नंबरमध्ये छेडछाड करता येत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्वच वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक नंबरप्लेट अनिवार्य करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार परिवहन विभागाकडे ३१ मार्च २०२५ पर्यंत जुन्या वाहनांची नोंदणी करणे आणि त्यानंतरच्या तीन महिन्यात नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बनविण्यासाठी झोन तयार करण्यात आले असून त्यासाठी तीन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. झोन दोनमध्ये सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालय एमएच ११ व एमएच ५३ फलटण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाची जबाबदारी रिअल मॅझॉन इंडिया या कंपनीकडे आहे.
तर झोन तीनमध्ये एमएच ५० कराड येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाची जबाबदारी एफटीए एचएसआरपी सोल्यूशन्स कंपनीकडे आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे शुल्क दुचाकी वाहनांसाठी ४५० रुपये, तीनचाकी वाहनांसाठी ५०० रुपये, कारसाठी १ हजार १०० रुपये व ट्रॅक्टरसाठी ४५० रुपये असल्याचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांनी सांगितले.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची वैशिष्ट्ये
वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने महत्वाचा निर्णय घेत सुरक्षा नियमांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्या प्लेटचा रंग आणि फॉन्ट वैयक्तिक आणि व्यावसायिक वाहन यांच्यातील फरक जाणून घेण्यासाठी डिझाइन केले आहे. पांढरा, पिवळा आणि हिरव्या रंगात प्लेट तयार केली जाते. या नंबर प्लेटवर इंडिया असे देखील मुद्रीत केले जात असून याशिवाय निळ्या रंगात अशोक चक्र आहे. नंबर प्लेट विशेष प्रकारच्या ॲल्युमिनियमपासून बनवलेल्या असतात. या नंबर प्लेटवर परावर्तित रंग आहेत. जे प्रकाशात सहज कॅप्चर होतात. या नंबर प्लेटस युनिक आयडेंटिफिकेशन नंबर प्रदर्शित करत असतात.
राज्यात वाहन सुरक्षा नियम दि. १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहेत. नवीन नियमानुसार राज्यातील सर्व नोंदणीकृत वाहनांना ३१ मार्च २०२५ पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविणे बंधनकारक आहे. नव्या वर्षापासून या नियमांचे पालन न केल्यास अशा वाहनधारकांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे.
– दशरथ वाघुले (प्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा)





