मराठी पाट्यांची पुण्यातही सक्ती; कारवाई करण्याचा पालिकेचा निर्णय

पुणे – मुंबईपाठोपाठ आता पुण्यातीलही दुकाने आणि अस्थापनांवरील पाट्या मराठीत लिहिण्याचा आदेश महापालिकेने काढला आहे. तसे न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. हे तपासण्याचे १५ क्षेत्रीय कार्यालयांना आकाशचिन्ह परवाना विभागाने आदेश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांत नावाच्या पाट्या मराठी भाषेत करण्यासंबंधी आदेश दिले होते. त्याची मुदत दि. २५ नोव्हेंबर रोजी संपली. मुंबई महापालिकेने पाट्या मराठीमध्ये करण्याचे आदेश दिले असून, कार्यवाहीलाही सुरूवात झाल्याचा दाखला देत मनसेने पुण्यातही त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांकडे मागणी करणारे निवेदन काही दिवसांपूर्वी दिले होते. तसेच न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
यानंतर महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने या संबंधात बुधवारी आदेश काढले. पाट्या मराठीमध्ये केल्या आहेत, की नाही हे तपासण्याचे आणि तसे नसेल तर कारवाई करण्याचे आदेश आणि अधिकार क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. पाट्या केवळ मराठीतच नव्हे तर त्या नियमानुसार लावण्यात आल्या आहेत का, हे देखील पाहणे आवश्यक असल्याचे या आदेशात म्हटले आहे.





