RBI Instructions: केवायसी नियमांचे पालन करा; रिझर्व्ह बँकेची व्यावसायिक बँकांना सूचना

मुंबई – व्यवसायिक बँकांनी नो युवर कस्टमर म्हणजे केवायसी च्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी. ज्या बँका असे करणार नाहीत त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर स्वामीनाथन जे यांनी म्हटले आहे.
नुकत्याच झालेल्या खासगी बँकांच्या संचालकांच्या परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, केवायसीची प्रक्रिया योग्यरीत्या पूर्ण केल्यानंतर पुढे प्रश्न निर्माण होत नाहीत. त्यामुळे केवायसी करताना आवश्यक मार्गदर्शक सूचनाची तंतोतंत अंमलबजावणी केली जाईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याचबरोबर बँकांनी ग्राहकांना सर्व सेवा योग्य पद्धतीने देण्याचा प्रयत्न करावा. ग्राहकांच्या तक्रारी असल्यास त्या कालबद्ध पद्धतीने सोडवाव्यात.
अनेकदा बँकांकडून तक्रारी सोडवण्याची यंत्रणा केवळ औपचारिक आहे असे समजले जाते. मात्र ही बाब गंभीर आहे आणि ग्राहकांच्या तक्रारी गंभीरपणे घेऊन त्या कालबद्ध पद्धतीने सोडविण्याची अपेक्षा असते. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेचे व्यवसायिक बँकांच्या कार्यपद्धतीकडे लक्ष असते असे त्यांनी सांगितले. बँकांची अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणा परिणामकारकरीत्या काम करीत आहे का याकडे वरिष्ठ व्यवस्थापनाने लक्ष देण्याची गरज आहे.
ते म्हणाले की, बँकांनी सर्व ग्राहकांना सन्मानाने सर्व सेवा उपलब्ध कराव्यात. वय, उत्पन्न गट, लिंग इत्यादी भेदभाव करण्याचा प्रकार घडू नये. देशाच्या आणि नागरिकांच्या विकासासाठी बँकिंग यंत्रणा मजबूत आणि कार्यक्षम असण्याची गरज आहे. यासाठी भारतीय बँकिंग व्यवस्था अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी सर्वच बँकांनी प्रयत्न करावेत.
आयटीकडे लक्ष द्यावे –
बँकांनी परंपरागत कामे कार्यक्षमरीत्या करावी. त्याचबरोबर त्यांच्यावर सोपविलेल्या इतर जबाबदार्या योग्य पद्धतीने पार पाडाव्यात. डिजिटल बँकिंग साठी पायाभूत सुविधा भक्कम रहाव्यात. यासंदर्भात काही तक्रारी असल्यास त्यात ताबडतोब सोडविण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा ग्राहकाचे आणि बँकांचे नुकसान होण्याची शक्यता असते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची सुरक्षा व्यवस्था वेळोवेळी बळकट करत राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.


