गणेशोत्सवात प्लाझ्मा, लेझरबीमवर पूर्ण बंदी

सातारा – गणेशोत्सवात प्लाझ्मा व लेझरबीमवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. शनिवार, दि. 7 रोजी गणरायाचे आगमन होत आहे. मंगळवार, दि. 17 रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दहा दिवसांमध्ये ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणार्या डॉल्बीवर कठोर कारवाई करून, त्या जागेवर जप्त करण्याचे आदेशही समीर शेख यांनी दिले आहेत.
ते म्हणाले, गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण शांततेत साजरे करावेत. गणेशोत्सवाच्या दुसर्या दिवशी, दि. 8, पाचव्या दिवशी, दि. 11, गौरी विसर्जन दि. 12, ईद-ए-मिलाद दि. 16, अनंत चतुर्दशी दि. 17 या दिवशी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकांचा वापर करता येणार आहे. या काळात औद्योगिक क्षेत्रात 70 डेसिबल, वाणिज्य क्षेत्रात 55 डेसिबल, निवासी क्षेत्रात 25 डेसिबल आणि शांतता क्षेत्रात 40 डेसिबल या मर्यादेतच ध्वनीक्षेपकांचा वापर करायचा आहे. यापेक्षा अधिक क्षमतेच्या डॉल्बी जागीच जप्त केल्या जाणार आहेत याशिवाय लेझर बीम, प्लाझ्मा या मानवी आरोग्याला अपायकारक यंत्रणांवर बंदी घालण्यात आली आहे.
गणेश मंडळांनी मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून, त्यांचे रेकॉर्डिंग किमान पंधरा दिवस जतन करावे. गणेशोत्सवात महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची स्वतंत्र दर्शनरांग करण्यात यावी. सडकसख्याहरींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची पाच पथके साध्या वेशात तैनात राहणार आहेत. महिला स्वयंसेवक आणि पोलिसांचे निर्भया पथक तैनात राहणार आहे. गणेश मंडळांनी विद्युत व्यवस्था रोषणाई करताना चांगल्या दर्जाच्या वायर्स वापराव्यात.
महावितरणकडून अधिकृत वीजजोडण्या घ्याव्यात. गणेशमूर्तीच्या संरक्षणाकरिता मंडळाचे किमान पाच कार्यकर्ते व खाजगी सुरक्षारक्षक 24 तास हजर ठेवावेत. जिल्ह्यातील सहाशे गुन्हेगारांना तडीपार करण्यात येणार आहे. डॉल्बीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याला साऊंड अॅनालायझर देण्यात आला असून, त्याद्वारे ध्वनिमर्यादेची तपासणी केली जाणार आहे. मोठ्या आवाजाचे डॉल्बी आढळल्यास, पंचनामे करून संबंधित डॉल्बीचालकांवर खटले दाखल करण्यात येतील, असा इशाराही शेख यांनी दिला.





