सातारा – खासगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवावा

सातारा – जिल्ह्यामध्ये खासगी फायनान्स कंपनीचा कारभार बेफाम झाला असून यावर कोणताही शासकीय प्रतिबंध नाही. हा मनमानी कारभार तातडीने थांबवावा अन्यथा शिवसेना स्टाईलने त्यांना धडा शिकवला जाईल, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिला. याबाबतचे निवेदन त्यांनी शुक्रवारी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना सादर केले.
निवेदनात नमूद आहे की खासगी सावकारीपेक्षाही अत्यंत वाईट पद्धतीने खासगी फायनान्स कंपन्यांची वसुली सुरू आहे. गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना वसुलीसाठी पाठवणे, मोठया आवाजात वयोवृद्ध, महिला व्यक्तींना धमकावणे, मोठ्याने गोंधळ करत कर्जदार व्यक्तीची बदनामी करणे, खातेदाराचा चेक वारंवार बाउन्स करून त्याला प्रमाणापेक्षा जास्त दंड लावणे, मोठ्या चारचाकी गाड्या पाठलाग करून ताब्यात घेणे यासारखे विचित्र प्रकार सध्या जिल्ह्यात सुरू आहेत.
सातारा तालुक्यात खासगी कंपनीच्या वसुलीच्या तगाद्याला कंटाळून एका मागासवर्गीय समाजातील महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या खासगी कंपन्यांच्या मनमानी कारभारावर कोणाचाही वचक नाही, याबाबत प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अन्यथा या फायनान्स कंपन्यांना शिवसेना स्टाईलने धडा शिकवला जाईल, असे निवेदनात नमूद आहे .
यावेळी जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्यासह सागर रायते, रुपेश वंजारी, शिवराज टोणपे ,रवींद्र भंडगे, हरी पवार, इम्रान बागवान, किशोर घोरपडे, राहुल मोहिते, संतोष किर्दत इत्यादी उपस्थित होते.



