बारामती : बारामतीचे प्रांताधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बारामतीत पैसे वाटपाच्या तक्रारी आल्या होत्या. त्यावरून काल रात्री शरयू टोयोटा या युगेंद्र पवार यांच्या मालकीच्या शोरूम वर तर अजित पवार यांचे निकटवर्तीय किरण गुजर अध्यक्ष असलेल्या नटराज नाट्यमंदिर या संस्थेवर छापेमारी केली. अर्थात दोन्ही ठिकाणी काही ही आढळून आले नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. बारामतीत पहिल्यांदाच ग्रामपंचायतच्या पातळी सारखी निवडणूक सुरू असून, गावागावात व गटगटात ही निवडणूक विभागली गेली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीवर पक्षीय कार्यकर्त्यांचे व नेत्यांचे व्यक्तिगत लक्ष आहे. त्यातून ही निवडणूक जास्त चुरशीची बनली आहे. त्यातून पैसे वाटपाच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकीतही पैसे वाटप होत असल्याच्या तक्रारी आल्याने निवडणूक आयोगाच्या पथकाने लक्ष ठेवले आहे. दरम्यान काल रात्री युगेंद्र पवार यांच्या शरयू टोयोटा या शोरूम मधील कार्यालयावर निवडणूक आयोगाच्या पथकाने तपासणी केली. मात्र यामध्ये काहीही आढळून आले नसल्याची माहिती प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे. दरम्यान नावडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या किरण गुजर यांच्या अध्यक्षते खालील नटराज नाट्यमंदिर या संस्थेवर ही निवडणूक आयोगाच्या पथकाने तपासणी केली होती. तिथे ही काही आढळले नसल्याची माहिती नावडकर यांनी दिली आहे. एकूणच बारामती मध्ये पहिल्यांदाच निवडणुकीच्या काळात पैसे वाटपा वरून कार्यालयांची झाडझडती होण्याची ही पहिलीच वेळ आहे.