शिक्षकांनीच घातला शिक्षकांना गंडा! 2 कोटींच्या फसवणुकीची तक्रार, राज्यात खळबळ

नेवासा (राजेंद्र वाघमारे) – शेअर्स कंपणीत गुंतवणूक केल्याचे गाजर दाखवून शिक्षक संघाचा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सालके याने शिक्षकांनाच कोट्यावधीचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. दरमहिण्याला गुंतवणूकपोटी एक लाख रुपयाला 20 हजार रुपये मिळत असल्यामुळे 10 हजार रुपये गुंतवणूक करणाऱ्यांना व दहा हजार रुपये आम्हाला ठेवणार असल्याची बतावणी करुन शिक्षकांसह इतरांना गंडा घातला आहे.
तब्बल 1कोटी79 लाख रुपयाला गंडा घातल्याची माहिती समोर आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतच्या अर्थिक घोटाळ्याची प्रथम फिर्याद नेवासा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली असून राज्यभरात शिक्षकांची फसवणूक झाली असून तब्बल 500 कोटी रुपयांचा अर्थिक घोटाळा झाल्याची जोरदार चर्चा जिल्हासह राज्यात सुरु झाली आहे.
ज्ञानार्जन करणाऱ्या गुरुंनीच गुरुंवर विद्या उलटावून आपले उखळ पांढरे करुन घेण्यात धन्यता मानत हा मोठा अर्थिक घोटाळा केला असून यामध्ये अनेक रथीमहारथी सामिल असल्याचे पोलिस तपासात उघड होणार असल्याची माहीती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे अनेकांचे धाबेदणानले आहेत तर काही फसवणूक करणारी मंडळी जिल्ह्यातून गुल झाली आहे.
या प्रकरणी नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील प्रसाद नंदकिशोर भणगे यांनी नेवासा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच गुंतवणूक केलेली रक्कम मला दाम दुप्पट करून देतो म्हणून आॉक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2020 दरम्यान पारनेर तालुक्यातील वैभव अनंत चेमटे, अनंत दत्तात्रय चेमटे, भूषण अनंत चेमटे (सर्व रा.भाळवणी ता. पारनेर) ,बाळासाहेब दगडू सालके, भाऊसाहेब सदाशिव सालके (रा.काळकूप ता.पारनेर,) निलेश भाऊसाहेब शिंदे (रा.टाकळी – ढोकेश्वर ता.पारनेर) यांनी 1 कोटी 79 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे, अशी लेखी फिर्याद नेवासा पोलिसांनी पोलिस दप्तरी दाखल केल्यामुळे अर्थिक घोटाळ्याचे बिंग फुटले असून फसवणूक करणारे आरोपी आता पसार होण्याची चाल खेळतांना आपल्या सोंगट्या फिरवत आहेत.
तोंड दाबून बुक्क्यांचा मार
दरम्यान या प्रकरणी मोठी साखळीच बाहेर येण्याची शक्यता आहे. दामदुप्पट आमिषाला जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक तसेच नोकरदार व्यक्तींसह बड्या रथी – महारथींचा समावेश असून फसवणूक झाल्याची चर्चा आहे. केवळ बोभाटा नको म्हणून तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची स्थिती फसल्या गेलेल्यांची झालेली होती. आता मात्र पोलिसांत तक्रार दाखल झाल्याने अनेक फसवणुक झालेले शिक्षक पुढे येवू लागले असून फिर्यादी दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच या प्रकरणात रथी – महारथी अडकले असून या अर्थिक घोटाळ्यालाही “राजाश्रय” असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे.
हा मोठा अर्थिक घोटाळा असल्याने संबंधित आरोपींच्या बाबतीत आवश्यक तो तपास व माहिती काढण्याचे काम चालू आहे, तसेच आम्ही आणखी ज्या – ज्या तक्रारी येतील त्याबाबत गुन्हा नोंदवून तपास कार्य सुरू राहील तांत्रि कबाबींची माहीती घेत असल्याचे तपासी अधिकारी नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाजीराव पोवार यांनी दैनिक प्रभात’शी बोलतांना सांगितले.





