Pune News: शिवसेना शिंदे गटातील आमदाराविरोधात कोथरूड पोलिसांकडे तक्रार दाखल
Pune News: फोनवरील कथित अश्लील शिवीगाळ, धमक्यांचा ऑडिओ व्हायरल

पुणे : बुलडाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी नामक व्यक्तीला फोनवरून आई, बहीण व पत्नीबाबत अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करत एका महिलेने कोथरूड पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार सोनाली त्रिंबक कांबळे यांनी केली आहे.
कांबळे यांनी ५ सप्टेंबर रोजी कोथरूड पोलिस ठाण्यात दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, त्या दहीहंडीचा कार्यक्रम व सजावट पाहण्यासाठी कोथरूड परिसरात आल्या होत्या. त्यावेळी सोशल मीडियावर, विशेषतः इन्स्टाग्रामवर, एक ऑडिओ प्रसारित झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या ऑडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुस्तकासंदर्भातील कथित वादातून आमदार संजय गायकवाड हे प्रशांत आंबी यांच्याशी फोनवर बोलताना अत्यंत गलिच्छ आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच, आंबी यांना घरात घुसून मारण्यासह जीभ कापण्याची आणि ठार करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारदाराने म्हटले आहे.
‘महाराजांचे नाव घेऊन अश्लील भाषा’
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपल्याला जाणीवपूर्वक आदर असून, महाराजांचे नाव घेत अशा प्रकारची अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरणे ही आक्षेपार्ह बाब असल्याचे तक्रारदाराने अर्जात नमूद केले आहे.
लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या आमदाराकडून अशा प्रकारची भाषा वापरली गेली असल्यास त्याची चौकशी होऊन कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, संबंधित ऑडिओची सत्यता, तो नेमका कधी व कोणामध्ये झालेल्या संभाषणाचा आहे तसेच त्यामधील आवाज आमदार संजय गायकवाड यांचाच आहे का, याबाबत पोलिस तपासानंतरच स्पष्टता येणार आहे. तक्रारीवर कोथरूड पोलिसांकडून पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाण्याची शक्यता आहे.






