राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा | नेमबाजी व तिरंदाजी स्पर्धा रद्द

नवी दिल्ली – बर्मिंगहॅममध्ये पुढील वर्षी होत असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा भाग असलेल्या नेमबाजी आणि तिरंदाजी खेळाच्या भारतात होत असलेल्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत.
करोनाचा धोका भारतात अद्याप कायम असल्यामुळे चंडीगढला होणाऱ्या या स्पर्धा न घेण्याचा निर्णय भारताच्या राष्ट्रकुल क्रीडा कार्यकारिणी समितीने राष्ट्रकुल क्रीडा महासंघाशी चर्चा करून घेतला आहे.
भारताचा वर्चस्व असलेला नेमबाजी क्रीडा प्रकार 2022 सालच्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून वगळण्याचा निर्णय 2019 सालात घेण्यात आला, तेव्हा भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) नाराजी प्रकट करून स्पर्धेवर बहिष्काराची धमकी दिली होती. परंतु डिसेंबर 2019 सालच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या चर्चेनंतर आयओएने बहिष्कार मागे घेतला.
राष्ट्रकुल स्पर्धेच्या सहा महिने आधी जानेवारी महिन्यात चंडीगढला नेमबाजी आणि तिरंदाजीच्या स्वतंत्र स्पर्धाचे आयोजन करण्याची योजना आखण्यात आली. ही पदके राष्ट्रकुल पदकतालिकेत समाविष्ट करण्याचेही निश्चित करण्यात आले, परंतु सद्यःस्थितीत स्पर्धाचे आयोजन करणे कठीण असल्याने त्या रद्द करण्यात आल्या आहेत.





