बर्मिंगहॅम – जागतिक क्रीडा स्पर्धेतील मानाची समजली जात असलेली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा येत्या 28 जुलैपासून सुरु होत आहे. यंदा या स्पर्धेसाठी भारतीय संघातील विविध खेळाडूंकडून गतस्पर्धेतील कामगिरीत जास्त सुधारणा अपेक्षित आहे. त्यातच या स्पर्धेच्या इतिहासात जलतरणात भारताला एकही पदक मिळवता आलेले नाही. यंदा हा दुष्काळ संपणार का याचीच उत्सूकता आहे. त्यातही श्रीहरी नटराजन व साजन प्रकाश यांच्यावर पदकाची मदार आहे. महिला जलतरणात गटात मात्र, एकही खेळाडू पात्र होउ न शकल्यामुळे भारताच्या पदरी निराशाच पडली आहे.
नटराज व साजन यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्रता मिळवली होती मात्र, प्रत्यक्ष स्पर्धेत त्यांना निराशाच हाती लागली होती. मात्र, त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर आजवर झालेल्या स्पर्धांमध्ये त्यांनी सरस कामगिरी केली आहे. त्यामुळे यंदा राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे हे दोन खेळाडू नवा इतिहास लिहिण्यासाठी सज्ज बनले आहेत.
अन्य क्रीडा प्रकारात या स्पर्धेत भारताचा इतिहास चांगला आहे. 2018 साली ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने 26 सुवर्ण, 20 रजत व 20 ब्रॉंझ अशी एकूण 66 पदके मिळवली होती. यंदा त्यात वाढ होत पदकांची शंभरी पार करण्याची खेळाडूंकडून अपेक्षा आहे.
पंतप्रधान देणार शुभेच्छा संदेश
बर्मिंगहॅममध्ये येत्या 28 जुलै ते 8 ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या सर्व भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधून त्यांना शुभेच्छाही देणार आहेत. टोकियो ऑलिम्पिकला रवाना होण्यापूर्वीही पंतप्रधान मोदी यांनी खेळाडूंशी संवाद साधला होता. तसेच विजया कामगिरीनंतर त्यांनी राजधानीत या सर्व खेळाडूंची भेटही घेतली होती व त्यांचे अभिनंदनही केले होते. आज (बुधवार) पंतप्रधान या खेळाडूंशी संवाद साधतील अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
भारताने कुस्ती, मुष्टियुद्ध, नेमबाजी, बॅडमिंटन, हॉकी या खेळांमध्ये पदके पटकावली आहेत. आता जलतरणातील अपयशी यंदा पूसुन निघावे अशी अपेक्षा केली जात आहे. पॅरा गटात या स्पर्धेत प्रशांत कर्माकरने 50 मीटर फ्रीस्टाइलमध्ये भारताला ब्रॉंझपदक मिळवून दिले होते. मात्र, मुख्य गटात अद्याप पदकाची प्रतिक्षा आहे.
यंदाच्या स्पर्धेसाठी भारताचे चार जलतरणपटू स्पर्धेत पात्र ठरले आहेत. साजन व नटराजसह कुशाग्र रावत व अद्वैत पाजे यांचा समावेश आहे. साजन 50 मीटर, 100 मीटर आणि 200 मीटर बटरफ्लायमध्ये सहभागी होणार आहे. नटराज 50 मीटर, 100 मीटर, 200 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये खेळेल. कुशाग्र 200 मीटर, 400 मीटर आणि 1500 मीटर फ्री स्टाईलमध्ये भाग घेणार आहे. अद्वैत 1500 मीटरमध्ये सहभागी होणार आहे.