Crude Oil Price Crash: डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि इराण (Iran) यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमती झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. ब्रेंट आणि WTI या दोन्ही बेंचमार्कमध्ये 16 ते 18 टक्क्यांपर्यंत घट झाली असून दर प्रति बॅरल सुमारे 90 डॉलरच्या जवळ आले आहेत. युद्धविराम करारानुसार होर्मुज सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पुन्हा सुरक्षितपणे सुरू करण्याची अट ठेवण्यात आली आहे. या मार्गातून जगातील सुमारे 20 टक्के तेल पुरवठा होतो. त्यामुळे या मार्गाचे उघडणे तेलबाजारासाठी महत्त्वाचे मानले जाते. ब्रेंट आणि WTI मध्ये किती घसरण? ब्रेंट क्रूड वायदा सुमारे 16 टक्क्यांनी घसरून 91.80 डॉलर प्रति बॅरलवर आला आहे, तर WTI क्रूड 18 टक्क्यांनी घसरून 92.62 डॉलरवर आला आहे. याशिवाय युरोपीय डिझेलच्या किमतीतही 20.8 टक्क्यांची घसरण होऊन त्या 1,210.50 डॉलर प्रति मेट्रिक टनपर्यंत खाली आल्या आहेत. हेही वाचा – बिहारमध्ये सत्तांतराची चाहूल; भाजपची दिल्लीत महत्त्वाची बैठक, दोन दिग्गज नेत्यांवर लक्ष होर्मुज सामुद्रधुनी टप्प्याटप्प्याने उघडणार? अमेरिका-इराण अधिकाऱ्यांच्या बैठकीपूर्वी इराणकडून हा जलमार्ग मर्यादित स्वरूपात पुन्हा सुरू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विश्लेषकांच्या मते, या मार्गामागे अडकलेला दररोज 10 ते 13 मिलियन बॅरल कच्चा तेल पुरवठा हळूहळू बाजारात येऊ शकतो. तज्ञांचा इशारा काय? तज्ञांच्या मते, सध्याची दरघसरण ही काही प्रमाणात ‘शॉर्ट कव्हरिंग’मुळेही असू शकते. त्यामुळे ही घट कायम राहीलच, असे निश्चित नाही. भविष्यात इराण (Iran) पुन्हा होर्मुज सामुद्रधुनीबाबत दबाव तंत्र वापरू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी किमतीत मोठी वाढ – अमेरिका-इराण-इस्रायल संघर्षामुळे यापूर्वी कच्च्या तेलाच्या किमतीत 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. मात्र, युद्धविरामामुळे बाजाराला काहीसा दिलासा मिळाला आहे. पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याने भविष्यात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, यावर सरकारी कर, रुपयाचा डॉलरसमोरील दर आणि तेल कंपन्यांची किंमत धोरणे यांचा मोठा प्रभाव असतो. त्यामुळे लगेच दरकपात होईलच, असे निश्चितपणे सांगता येत नाही.