Bihar Politics: बिहारमध्ये सत्तांतराची चाहूल; भाजपची दिल्लीत महत्त्वाची बैठक, दोन दिग्गज नेत्यांवर लक्ष
Bihar Politics: जनता दल (युनायटेड)मध्येही राजकीय हालचालींना वेग आला आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि विधान परिषदेचे सदस्य नीरज कुमार यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी पोस्टर लावून मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांना पुढे आणण्याचे संकेत दिले आहेत.

Bihar Politics: बिहारमध्ये संभाव्य सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) हालचाली वेगवान केल्या आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने शुक्रवारी दिल्लीत बिहारमधील वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांच्यासह प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी आणि कोर ग्रुपमधील सदस्य सहभागी होणार आहेत.
या बैठकीला पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाची उपस्थिती राहणार असून, बिहारमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विधानमंडळ पक्षाची बैठक बोलावणे, नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी आदी मुद्द्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण अभियान’ यासंदर्भातही १० एप्रिल रोजी दिल्लीत आणखी एक बैठक होणार आहे. या बैठकीत देशभरातील पदाधिकाऱ्यांसह बिहारमधील नेते सहभागी होतील. बिहारमधील १४२० मंडळांमध्ये हे प्रशिक्षण अभियान राबविण्यात येणार असून, त्यानंतर जिल्हास्तरावरही ते विस्तारले जाणार आहे.
हेही वाचा – इराणने होर्मुझमध्ये तेल टँकर रोखला; इस्रायलला दिली थेट धमकी, युद्धबंदी धोक्यात?
जदयूकडून निशांत कुमार पुढे येण्याची चिन्हे –
दुसरीकडे, जनता दल (युनायटेड)मध्येही राजकीय हालचालींना वेग आला आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि विधान परिषदेचे सदस्य नीरज कुमार यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी पोस्टर लावून मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांना पुढे आणण्याचे संकेत दिले आहेत.
या पोस्टरमध्ये ‘विरासत मजबूत, भविष्य दमदार – निशांत कुमार तयार’ असा संदेश देण्यात आला असून, त्यात नीतीश कुमार आणि निशांत यांचे छायाचित्र आहे. तसेच जदयूचे निवडणूक चिन्ह ‘बाण’ही दर्शविण्यात आले आहे.
नीरज कुमार यांनी सांगितले की, नीतीश कुमार यांची राजकीय परंपरा पुढे नेण्यासाठी निशांत कुमार सक्षम आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही त्यांना सक्रिय भूमिकेत पाहण्याची मागणी होती. निशांत आता पुढे येत असल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असल्याचे त्यांनी नमूद केले.





